पणजी: गोव्यातील गवळी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या प्रदीर्घ राजकीय आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न करत आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः दिल्लीत केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात असून या संवेदनशील विषयाचा गांभीर्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
१९६३ सालापासून या समाजाकडून एसटी आरक्षणाची मागणी केली जात आहे. राज्यातील गावडा, कुणबी आणि वेळीप या समाजांना आरक्षणाचा लाभ मिळालेला असताना, धनगर समाज मात्र तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे यापासून वंचित राहिला आहे. जरी या समाजाची लोकसंख्या तुलनेने कमी असली, तरी त्यांची सामाजिक ओळख अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे या समाजाला घटनात्मक हक्क आणि राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण करताना काही तांत्रिक व कायदेशीर बाबी समोर येत असल्या, तरी राज्य सरकार आवश्यक ते अहवाल आणि कागदपत्रे केंद्र सरकारला नियमितपणे पाठवत आहे. प्रशासकीय पातळीवरील सर्व तांत्रिक अडथळे लवकरात लवकर दूर करून ही प्रक्रिया सकारात्मक शेवटास नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. धनगर समाजाला एसटी दर्जा मिळाल्यास त्यांना शिक्षण, शासकीय रोजगार आणि राजकीय क्षेत्रात समान संधी उपलब्ध होतील. राज्य सरकार या न्याय्य मागणीशी कटिबद्ध असून केंद्र सरकारच्या सहकार्याने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.


