मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. घाटकोपर-कुर्ला मार्गावरील चिरॉग नगर, अशोक नगर परिसरातील गौसिया चाळीत बुधवारी पहाटे ३:४८ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग अचानक कोसळून थेट २ ते ३ घरांवर आला. या दुर्दैवी दुर्घटनेत दोन नागरिकांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची तीव्र भीती व्यक्त केली जात आहे. पहाटेच्या वेळी नागरिक गाढ झोपेत असताना ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत सुरुवातीचे मदतकार्य सुरू केले. त्यानंतर काही वेळातच मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, घाटकोपर पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या या सर्व यंत्रणांच्या माध्यमातून ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर संयुक्त बचावमोहीम राबवली जात आहे.
या बचावकार्यादरम्यान ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १८ वर्षीय सोहेल अंसारी आणि १४ वर्षीय मोहम्मद अंसारी या दोन मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली अद्याप ४ ते ८ नागरिक अडकल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वाजिद अली, आरिफ शेख, सद्दाम शेख यांसारखे काही नागरिक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच खरी परिस्थिती स्पष्ट होईल.
दरम्यान, या भागात राहणाऱ्या धोकादायक घरांना महानगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वस्त्या पावसाळ्यात अत्यंत संवेदनशील ठरत असल्याने सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून आसपासच्या धोकादायक घरांमधील नागरिकांना तात्पुरत्या सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईतील डोंगराळ भागातील वस्त्यांच्या सुरक्षेचा आणि पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


