हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्यास अणुकराराशिवायही इराणसोबत युद्ध थांबवण्यास ट्रम्प तयार

अमेरिकेकडून युद्धबंदीचे संकेत

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th August, 11:42 am
हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्यास अणुकराराशिवायही इराणसोबत युद्ध थांबवण्यास ट्रम्प तयार

वॉशिंग्टन : इराणसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अणुकराराशिवायही युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे वृत्त आहे. (Trump Willing To End Iran War Without Nuclear Deal If Hormuz Reopens ) मात्र, त्यासाठी इराणने व्यापारी वाहतुकीसाठी हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करावी, अशी अमेरिकेची अट असल्याचे द वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तात म्हटले आहे.

इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेसमोर अनेक मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये अब्जावधी डॉलरची भरपाई, अमेरिकेची लष्करी कारवाई थांबवणे, इराणवरील निर्बंध उठवणे, गोठवलेली इराणी संपत्ती मोकळी करणे आणि प्रादेशिक चर्चेत अमेरिकेचा हस्तक्षेप थांबवणे यांचा समावेश आहे.

युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाईही इराणने मागितली आहे. तसेच इराणच्या प्रादेशिक मित्रराष्ट्रांविरोधातील अमेरिकेच्या धमक्या आणि लष्करी कारवाया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात इराणला अणुकार्यक्रम पुन्हा पूर्ववत करणे शक्य होणार नाही, असे सांगितल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे अणुकरार न झाल्यासही संघर्ष संपवण्याचा पर्याय ट्रम्प यांच्या विचाराधीन असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेचे लक्ष सध्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची निर्बंधमुक्त वाहतूक सुरू करण्यावर आहे. ओमान आणि इराण यांच्यात सामुद्रधुनीबाबत चर्चा सुरू असून, त्यात प्रगती झाल्याचे एका अमेरिकन अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले. लवकरच करार होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

करार झाल्यानंतर व्यापारी वाहतूक सुरळीत करण्याच्या इराणच्या अंमलबजावणीच्या बदल्यात अमेरिकेकडून इराणी बंदरांवरील नाकेबंदी उठवली जाऊ शकते, असेही संकेत मिळत आहेत. अमेरिकेने मात्र आपली पुढील पावले इराणने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केल्यानंतरच उचलली जातील, असे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, इंधनाच्या किमती नियंत्रणात राहिल्यास ट्रम्प सध्याची परिस्थिती आणखी काही काळ संयमाने हाताळण्याच्या तयारीत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा
सर्व पहा