आंबोली धबधब्यावर साप चावल्याने हम्पी येथील पर्यटकाचा मृत्यू

वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचारांअभावी गमावले प्राण

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
09th August, 08:12 pm
आंबोली धबधब्यावर साप चावल्याने हम्पी येथील पर्यटकाचा मृत्यू

सावंतवाडी : प्रसिद्ध पर्यटन स्थळ आंबोली येथील धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटताना सापाने चावा घेतल्याने कर्नाटकातील हम्पी येथील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाधर मरप्पा (वय ३८, रा. हम्पी) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे या पर्यटकाला प्राण गमवावे लागले. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हम्पी येथील पर्यटकांचा एक समूह वर्षा पर्यटनासाठी आंबोली धबधबा परिसरात आला होता. मुख्य धबधब्याच्या बाजूला आंघोळ करत असताना अचानक एका सापाने गंगाधर याला चावा घेतला. यामुळे तो जागीच कोसळला.
त्यांना तातडीने आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले; मात्र तेथे पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अडीच तास वाहतूक कोंडी; वाटेतच तडफडून मृत्यू
मुख्य धबधबा परिसरात पर्यटकांच्या वाहनांची प्रचंड गर्दी आणि मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेला आंबोली घाटातून खाली उतरण्यासाठी तब्बल अडीच तासांचा कालावधी लागला. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पोचण्यापूर्वीच वाटेत गंगाधरचा मृत्यू झाला. चावा घेणारा साप ‘मण्यार’ किंवा ‘नाग’ प्रजातीचा असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूसंदर्भात अधिक माहिती स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे आंबोली पर्यटन क्षेत्रातील आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा
सर्व पहा