‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत दिल्ली पोलिसांचा दणका; ७२ तासांत २३ गुन्हेगारांना अटक

जप्त केलेल्या ३९० मोबाईलची ‌किंमत १.५ कोटी ६६ वाहने, १९ अवैध शस्त्रे आणि ६२ लाखांचे दागिने जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16 mins ago
‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत दिल्ली पोलिसांचा दणका; ७२ तासांत २३ गुन्हेगारांना अटक

नवी दिल्ली : दिल्लीतील उत्तर-पश्चिम जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत मोठी कारवाई करत अवघ्या ७२ तासांत २३ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरी व झडपमारीतील ३९० मोबाईल,  ६६ दुचाकी व चारचाकी वाहने, १९ अवैध शस्त्रे, २१ चाकू तसेच सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. जप्त मोबाईलची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये, तर दागिन्यांची किंमत सुमारे ६२ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उत्तर-पश्चिम जिल्ह्याच्या पोलीस उपायुक्त आकांक्षा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस पथकांनी ही कारवाई केली. अँटी-बर्गलरी सेलने ५४ मोबाईल, एक दुचाकी आणि १२ लाख रुपयांचे दागिने, तर एएटीएसने २७ मोबाईल जप्त केले.

मॉडेल टाऊन पोलिसांनी २२ मोबाईल, तीन दुचाकी, एक कार, एक अवैध शस्त्र, एक चाकू आणि ३२ जिवंत काडतुसे जप्त केली. जहांगीरपुरी पोलिसांनी ४६ मोबाईल, सात दुचाकी, चार अवैध शस्त्रे आणि तीन चाकू हस्तगत केले.

महेंद्र पार्क पोलिसांनी सात मोबाईल,  तीन दुचाकी, एक अवैध शस्त्र व चार चाकू, तर शालीमार बाग पोलिसांनी ३५ मोबाईल, पाच दुचाकी, एक अवैध शस्त्र, दोन चाकू आणि तीन लाख रुपयांचे दागिने जप्त केले.

याशिवाय मौर्या एन्क्लेव्हमधून १४ मोबाईल व चार दुचाकी, सुभाष प्लेसमधून ६० मोबाईल, तीन दुचाकी, दोन अवैध शस्त्रे व १२ लाखांचे दागिने, तर केशवपूरममधून १५ मोबाईल, सहा दुचाकी, एक अवैध शस्त्र व १२ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले.

भारत नगर पोलिसांनी ३६ मोबाईल, १२ दुचाकी व दोन अवैध शस्त्रे, अशोक विहार पोलिसांनी २३ मोबाईल, तीन दुचाकी, एक अवैध शस्त्र, चार चाकू आणि पाच लाख रुपयांचे दागिने, तर आदर्श नगर पोलिसांनी २३ मोबाईल, १३ दुचाकी, दोन अवैध शस्त्रे आणि पाच चाकू जप्त केले.

मुखर्जी नगर पोलिसांनी २७ मोबाईल, सहा दुचाकी आणि दोन चाकू जप्त केले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.  तांत्रिक तपासणीच्या माध्यमातून हा मुद्देमाल संबंधित गुन्ह्यांच्या एफआयआरशी जोडण्याचे काम सुरू आहे.

अटक केलेल्या आरोपींविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. 

हेही वाचा
सर्व पहा