बँकॉक: येथील 'डेबसिरिन नोंथाबुरी स्कूल'मध्ये शुक्रवारी (७ ऑगस्ट) एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घडवलेल्या अत्यंत धक्कादायक आणि भीषण गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेत अंधाधुंध गोळीबार करण्यापूर्वी स्वतःच्या घरी आजोबांच्या पिस्तूलाचा वापर करून आजी आणि आजोबांची निर्घृण हत्या केली. यानंतर थेट शाळेत पोहोचून त्याने ३ शिक्षक आणि ३ विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडून त्यांचा बळी घेतला. स्थानिक सूत्रांनुसार, या भीषण घटनेत आरोपी विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा सुरू असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज झाला आणि परिसरात प्रचंड खळबळ उडाली. या विद्यार्थ्याने एकूण २६ राऊंड्स झाडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून घटनास्थळावरून अजून ३४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गोळीबाराच्या वेळी जीव वाचवून पळ काढण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी होऊन १५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, प्रथमोपचार पथक आणि बचाव दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या थरारानंतर घाबरलेले पालक आपल्या मुलांना सुरक्षित घरी नेण्यासाठी शाळेबाहेर गर्दी करताना दिसले.
थायलंडचे उपपंतप्रधान अनुतिन चारनविराकुल यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही अत्यंत भयानक आणि वेदनादायी घटना असून, आपल्या देशात असे कृत्य घडणे दुर्दैवी आहे,” असे सांगत त्यांनी पीडितांना सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अजून अस्पष्ट असून रॉयल थाई पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. थायलंडमध्ये बंदूक बाळगण्याचे प्रमाण अतिशय जास्त आहे. तिथे अंदाजे १ कोटी बंदुका नागरिकांकडे असून, दर सात व्यक्तींमागे एक बंदूक असे हे प्रमाण आहे. यापूर्वी २०२२ मध्येही एका माजी पोलीस अधिकाऱ्याने नर्सरीमध्ये असाच गोळीबार करून २४ लहान मुलांसह ३६ जणांची हत्या केली होती. या ताज्या घटनेमुळे थायलंडमधील शिथिल बंदूक कायद्यांवर आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


