मुख्यमंत्री विजय-त्र‌िशाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य; उदयनिधी स्टॅलिनला अटक

कावेरी आंदोलनातील भाषणानंतर कारवाई; अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
53 mins ago
मुख्यमंत्री विजय-त्र‌िशाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य; उदयनिधी स्टॅलिनला अटक

चेन्नई : द्रमुक (DMK) नेते आणि तामिळनाडू विधानसभेतील विरोधी पक्षनेते उदनयनिधी स्टॅलिन ( Udhayanidhi Stalin) यांना मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (C. Joseph Vijay) आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह आणि द्विअर्थी वक्तव्य केल्याप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी अटक केली. (DMK’s Udhayanidhi Stalin arrested over remarks about Tamil Nadu CM Vijay and Trisha)

चेन्नईतील नीलांकराई येथील निवासस्थानाबाहेर काही काळ चर्चेनंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीसाठी त्यांना तंजावूर येथे नेण्यात आले. ही कारवाई कावेरी नदीच्या पाणीवाटप प्रश्नावर आणि मेकेदातू धरण प्रकल्पाच्या विरोधात द्रमुकने आयोजित केलेल्या आंदोलनातील भाषणानंतर करण्यात आली. भाषणादरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना केलेल्या एका वक्तव्याचा व्यापक स्तरावर लैंगिक सूचक आणि आक्षेपार्ह अर्थ लावण्यात आला. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

न्यायालयात कायदेशीर लढा देणार : स्टॅल‌िन 

अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनिधी स्टॅलिन यांनी, "मी जे बोललोच नाही, त्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे. जनतेच्या खऱ्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे," असा आरोप केला. तसेच सत्ताधारी सरकारवर टीका करत त्यांनी हा संपूर्ण प्रकार "कॉमेडी" असल्याचे म्हटले आणि न्यायालयात कायदेशीर लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.

गंभीर कलमांचा समावेश 

तंजावूर पूर्व पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हेगारी कट, समाजात वैमनस्य पसरवणे, दंगल भडकवणे, महिलेच्या सन्मानाचा अपमान, सार्वजनिक ठिकाणी अश्लील वक्तव्य, गुन्हेगारी धमकी, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे आदी गंभीर कलमांचा समावेश आहे. याशिवाय तामिळनाडू महिला छळ प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कॉंग्रेस, भाजप, टीव्हीकेडून वक्तव्याचा निषेध 

या प्रकरणावर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस, भाजप आणि सत्ताधारी टीव्हीकेने (TVK)  उदयनिधी यांच्या वक्तव्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली. दुसरीकडे द्रमुकने मात्र उदयनिधी यांच्या वक्तव्याचे समर्थन करत, ते सरकारच्या अपयशावर केलेले राजकीय भाष्य असल्याचा दावा केला.

हेही वाचा
सर्व पहा