गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा कहर; घेतला २२ बालकांचा बळी

१५ वर्षांखालील मुलांनाच संसर्ग; वाळूमाशी नियंत्रणासाठी मोहीम तीव्र

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
41 mins ago
गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा कहर; घेतला २२ बालकांचा बळी

अहमदाबाद : गुजरातमध्ये यंदाच्या पावसाळ्यात चांदीपुरा विषाणूने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आतापर्यंत २२ बालकांचा मृत्यू झाला आहे. (22 children die of Chandipura virus in Gujarat, 7 under treatment) राज्यात संशयित १८४ रुग्णांपैकी ३५ जणांना संसर्गाची पुष्टी झाली आहे. ११ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री प्रफुल पानसेरिया यांनी सोमवारी दिली.

सध्या सात बालकांवर राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत, तर सहा बालकांनी उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे. गांधीनगर, हिम्मतनगर (साबरकाठा), पाटण, राजकोट आणि भावनगर येथील रुग्णालयांमध्ये विशेष उपचार सुरू आहेत.

राज्यातील विविध भागात आढळले रुग्ण 

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्व बाधित मुले १५ वर्षांखालील आहेत. संसर्ग कोणत्याही एका जिल्ह्यात किंवा गावापुरता मर्यादित नसून राज्यातील विविध भागांत रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाने संपूर्ण राज्यात सतर्कता वाढवली आहे

वाळूमाशींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी 

विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून वाळूमाशींचे प्रमाण कमी करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी, विशेषतः पशुपालन क्षेत्रांमध्ये, मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. तसेच मातीच्या घरांतील व भिंतींतील भेगा बुजवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे, कारण अशा ठिकाणी वाळूमाशांची पैदास होण्याची शक्यता अधिक असते.

लक्षणे दिसणाऱ्या मुलांना आयसीयूत दाखल करण्याचे निर्देश 

राज्यातील सर्व शासकीय व खासगी बालरुग्णालयांना तीव्र ताप, उलट्या, आकडी किंवा शुद्ध हरपणे अशी लक्षणे दिसणाऱ्या मुलांना तातडीने अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधेसह त्वरित उपचार मिळाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

चांदीपुरा विषाणूवर सध्या लस नाही 

चांदीपुरा विषाणूवर सध्या कोणतीही लस किंवा विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. त्यामुळे लवकर निदान आणि तातडीचे उपचार हाच प्रभावी उपाय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

आरोग्यमंत्री प्रफुल पानसेरिया यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, मुलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण व प्रतिबंधात्मक मोहिमांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.

चांदीपुरा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार 

चांदीपुरा विषाणू हा वाळूमाशींद्वारे पसरणारा दुर्मिळ विषाणूजन्य आजार असून तो मेंदूला सूज (एन्सेफलायटिस) आणू शकतो. या विषाणूची प्रथम नोंद १९६५ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपुरा गावात झाली होती. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आढळतो आणि वेळेत उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो.

हेही वाचा
सर्व पहा