नवी दिल्ली : देशभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांत पूर, भूस्खलन आणि ढगफुटीच्या घटनांनी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाम, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळून आतापर्यंत १४७ जणांचा मृत्यू झाला आहे. (Heavy monsoon rains across India have triggered severe floods and landslides, causing at least 82 deaths in Assam, 35 in Gujarat, and 30 in Jammu and Kashmir) लाखो नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून शेती, उद्योग आणि वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आसाममधील मृतांचा आकडा ८२ वर
आसाममध्ये सर्वाधिक फटका बसला असून मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. शिवसागर, जोरहाट, गोलाघाट, नगाव आणि चराईदेव या जिल्ह्यांतील १.९० लाखांहून अधिक नागरिक अजूनही पुराच्या विळख्यात आहेत. शेकडो गावे आणि २१ हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. हजारो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले असून राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी सहा महिन्यांच्या कर्जहप्त्यांना स्थगिती जाहीर केली आहे.
गुजरातमध्ये ३५ जणांचा मृत्यू
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. वलसाड, नवसारी, सुरत आणि अहमदाबादमध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली. अनेक औद्योगिक वसाहती, गोदामे आणि वाहन उद्योगांना तात्पुरते कामकाज बंद करावे लागले. सात हजारांहून अधिक नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून पूराचे पाणी हळूहळू ओसरत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ३० जणांनी गमावले प्राण
जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पूंछ आणि राजौरी भागात अनेक घरे कोसळली असून भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) अनेक ठिकाणी बंद झाला आहे. त्यामुळे वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात वाहतुकीला फटका; चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून शेकडो रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. उत्तराखंडमधील चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून १०० हून अधिक रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये रेड, ऑरेंज अलर्ट
केरळसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. किनारपट्टी भागात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
दरम्यान, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, लष्कर, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव व मदतकार्य युद्धपातळीवर राबवत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


