कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील देऊचा (Deucha) गावात निवृत्त सरकारी बसचालकाच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल रोख रक्कम व सोने मिळून तब्बल ५० कोटींचे घबाड जप्त करण्यात आले. त्यात २१.५ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे व बार तसेच २८.५ कोटी रुपयांहून अधिक रोकड होती. (Rs 21.5 crore gold, Rs 28.5 crore cash recovered from bus driver's house in West Bengal) या कारवाईमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. जप्त केलेल्या नोटांची मोजणी उशिरापर्यंत सुरू होती.
मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी ट्वीटरवर फोटो शेअर करून यासंदर्भात माहिती दिली. कारवाई करण्यात सहभागी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त बस चालक मिनार मंडल याच्याकडे देऊचा येथील दगड खाणी परिसरातील सात टोल नाक्यांपैकी एका नाक्यावरून दगड वाहतूक करणाऱ्या ट्रकांकडून महसूल वसूल करण्याची जबाबदारी होती.
ही जबाबदारी त्याला बीरभूममधील दगड व वाळू माफीया तुलू मंडल उर्फ मोहमद नझीबुद्दीन याने दिल्याचा संशय आहे. नोटा मोजताना मशिनही अपुरी पडू लागली व मध्येमध्ये बंद पडू लागली.
याप्रकरणात तपास यंत्रणांना महसूल वसुलीतील मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आहे. सरकारी महसुलातील रक्कम अपहार करून ती बेकायदेशीररित्या साठविण्यात आली का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्तींचे संबंध आणि पैशांचा स्रोत याबाबत पोलीस अधीक चौकशी करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा गुन्हेगारांना संरक्षण देणारे आणि त्यांच्या बेकायदेशीर कमाईचा लाभ घेणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि महसूल व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


