नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांच्या अत्याधुनिक 'फेस रिकग्निशन सिस्टीम' या चेहरा ओळखणाऱ्या तंत्रज्ञानाने एक धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. २० ते २५ जुलै या कालावधीत आंदोलनाच्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात तब्बल २ हजार ८७३ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची उपस्थिती स्पष्ट झाली आहे. या निष्पन्नामुळे लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागण्यामागे कोणत्या बाह्य समाजकंटकांचा हात होता का, या दृष्टीने तपास यंत्रणांनी चौकशीचा वेग वाढवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, एफआरएसद्वारे ओळख पटलेल्या व्यक्तींपैकी ९८९ जणांवर खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा, अपहरण, अमली पदार्थ विक्री आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे नोंद आहेत. यामध्ये १०१ जण खुनाच्या गुन्ह्यातील, ६१ जण खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी, तर २८४ जण दरोड्याच्या गुन्ह्यांतील संशयित आहेत. तसेच ६१ बलात्कार आणि ६ पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या व्यक्तींचाही या गर्दीत समावेश होता. तपासात असेही आढळले आहे की, यातील अनेकजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. काही संशयित आंदोलनाच्या ठिकाणी वारंवार येत असल्याचे तांत्रिक तपासात स्पष्ट झाले आहे.
जंतरमंतर आणि लगतच्या परिसरात झालेली दगडफेक, पोलिसांवरील हल्ले, वाहनांची तोडफोड आणि बॅरिकेड्स तोडण्याच्या घटनांमध्ये या गुन्हेगारांचा थेट सहभाग होता का, याचा कसून तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केला जात आहे. मात्र, केवळ आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असणे म्हणजे हिंसाचारात थेट सहभाग असल्याचा पुरावा मानला जाणार नाही, असे सांगत पोलीस प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी केली जाईल स्पष्ट केले आहे.


