Home >> देश -परदेश >> संसद मोर्चादरम्यान आरएएफकडून पेल्लेट गनचा वापर?; सीआरपीएफकडून चौकशी सुरू

संसद मोर्चादरम्यान आरएएफकडून पेल्लेट गनचा वापर?; सीआरपीएफकडून चौकशी सुरू

जंतर-मंतर आंदोलन; जखमी आंदोलकांचे दावे, सरकारचा इन्कार कायम

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
संसद मोर्चादरम्यान आरएएफकडून पेल्लेट गनचा वापर?; सीआरपीएफकडून चौकशी सुरू

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथून २० जुलै रोजी काढण्यात आलेल्या 'संसद चलो' मोर्चादरम्यान रॅपिड अॅक्शन फोर्सच्या (RAF) जवानांकडून पेल्लेट गनचा वापर झाल्याच्या वृत्तानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) या घटनेचा सविस्तर आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. (RAF used pellet guns on protesters during Parliament march, probe on: Sources) 

सूत्रांच्या माहितीनुसार, आरएफएच्या एका जवानाने पेल्लेट राऊंड झाडले असून; त्यातील काही पेल्लेट जमिनीवर आदळून आंदोलक जखमी झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

 दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारने आंदोलनादरम्यान पेल्लेट गनचा वापर झाल्याचा आरोप स्पष्टपणे फेटाळला आहे. मात्र, जखमी आंदोलकांनी समोर येत पेल्लेट लागल्याचा दावा केल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सीआरपीएफकडून या संपूर्ण कारवाईचा अंतर्गत आढावा घेतला जात आहे. चौकशीनंतर अधिकृत अहवाल सादर केला जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस परिसरात झालेल्या चकमकीत आरएएफचे ४७ हून अधिक जवान देखील जखमी झाले. त्यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली आहे. आंदोलनादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलीस आणि आरएफए यांनी अश्रुधूराच्या नळकांड्या तसेच लाठीचार्जचा वापर केला होता.

सीआरपीएफच्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) प्रत्येक मोठ्या कारवाईनंतर अशा प्रकारचा व्यावसायिक आढावा घेतला जातो. या पुनरावलोकनात आरएएफच्या कारवाईची आवश्यकता, वापरलेली साधने आणि संपूर्ण मोहिमेचे मूल्यमापन केले जाणार आहे.

दरम्यान, जंतर-मंतर आंदोलनात सहभागी झालेल्या किमान चार आंदोलकांना पेल्लेट लागल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यापैकी एका जखमी आंदोलकाच्या वैद्यकीय अहवालात पेल्लेट लागल्याची नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जखमी आंदोलक साहिल लोछाब याच्यासह उपस्थित राहत सरकारवर गंभीर आरोप केले. साहिलच्या शरीरावरील जखमा दाखवत राहुल गांधी म्हणाले, "सरकार पेल्लेट गन वापरल्याचा इन्कार करत आहे, पण ही जखमच त्याचा पुरावा आहे. भारताच्या भविष्यावर गोळ्या झाडण्याचे काम सरकारने केले आहे." त्यांनी साहिलच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याचाही दावा केला.

साहिल लोछाबने सांगितले की, आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने बंदूक रोखल्याचे दिसताच तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचवेळी त्याच्या पाठीवर आणि उजव्या हाताजवळ पेल्लेट लागले. सुरुवातीला वेदना जाणवल्या नाहीत; मात्र काही क्षणांनी अंगावर जळजळ होऊ लागली आणि रक्तस्त्राव सुरू झाल्याचे सांगितले. परिसरातील इतर काही आंदोलकांनाही अशाच प्रकारच्या जखमा झाल्याचा त्याचा दावा आहे.

दरम्यान, पेल्लेट गनचा वापर हा गर्दी नियंत्रणासाठीचा अंतिम पर्याय मानला जातो. इशारे, समजावणी, अश्रुधूर किंवा पाण्याचे फवारे यांसारख्या कमी घातक उपाययोजना निष्फळ ठरल्यानंतरच पेल्लेट गनचा वापर करण्याची तरतूद आहे. सध्या या प्रकरणातील तथ्य समोर आणण्यासाठी सीआरपीएफची चौकशी सुरू असून, अधिकृत अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा