Home >> देश -परदेश >> कोलकात्यात नीट पेपरलिक विरोधातील निदर्शनादरम्यान हिंसाचार; 'अँटी गुंडा कायदा' लागू

कोलकात्यात नीट पेपरलिक विरोधातील निदर्शनादरम्यान हिंसाचार; 'अँटी गुंडा कायदा' लागू

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
31 mins ago
कोलकात्यात नीट पेपरलिक विरोधातील निदर्शनादरम्यान हिंसाचार; 'अँटी गुंडा कायदा' लागू

कोलकाता : 'नीट' पेपर फुटीप्रकरणावरून देशभरात संतापाची तीव्र लाट उसळलेली असतानाच, पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात 'जेन झी' विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला अत्यंत गालबोट लागले. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि पत्रकारांवर झालेल्या भयंकर हल्ल्यांनंतर पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार घडवणाऱ्या समाजकंटकांविरोधात राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन 'अँटी-गुंडा ॲक्ट' लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी विधानसभेत या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताना दोषींना पुढील सात पिढ्या लक्षात राहील, अशी अद्दल घडवण्याचा थेट इशारा दिला आहे.

देशभरात विद्यार्थ्यांच्या वाढत्या जनआक्रोशामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री Dharmendra Pradhan यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी या निदर्शनांचे रूपांतर अचानक हिंसक वळणात झाले. कोलकात्यातील धर्मतला आणि एस्प्लेनेड परिसरात आयोजित रॅलीत काही असामाजिक घटकांनी शिरकाव करून धुडगूस घातला. सुरुवातीला शांततेत चाललेल्या या मोर्चात अचानक आंदोलनकर्त्यांच्या वेषात आलेल्या उपद्रवी तत्वांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर आणि घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर बूट तसेच पाण्याच्या बाटल्या फेकून हल्ला चढवला.

या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेत विशेष निवेदन सादर केले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, हिंसाचार घडवणारे सुमारे ७० लोक हे अजिबात विद्यार्थी नव्हते. तसेच त्यांचा 'नीट' paper leak च्या आंदोलनाशी किंवा हे आंदोलन आयोजित करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थी संघटनेशी दूरवरचा संबंध नव्हता. केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराचा वापर करण्यास प्रवृत्त करून मोठा तमाशा उभा करणे, हाच या समाजकंटकांचा मुख्य हेतू होता. परंतु, कोलकाता पोलिसांनी अत्यंत संयम दाखवत उपद्रवचाऱ्यांचा हा डाव पूर्णपणे उधळून लावला. पोलिसांनी दाखवलेली ही संयमी भूमिका अत्यंत कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला असून तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी 'पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटकांच्या कारवायांवर नियंत्रण कायदा, २०२६' लागू करत असल्याचे जाहीर केले. या कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून अशा गुंडांना आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना धडा शिकवला जाईल, असे ते म्हणाले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून मेटियाबुर्ज येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद अफ्रोज याला अंडाल येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह इतर नऊ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण प्रकरणात एकूण सात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी थेट एसएसकेएम (SSKM) रुग्णालयात जाऊन उपचाराधीन असलेल्या जखमी पत्रकारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेला हा हल्ला अतिशय गंभीर असल्याने हा मुद्दा सभागृहाच्या पटलावर मांडणे आवश्यक होते, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सुरक्षेची ग्वाही दिली. या धडक कारवाईमुळे आता पश्चिम बंगालमधील राजकीय व सामाजिक वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा