Home >> देश -परदेश >> देशभरात मुसळधार; आसाममध्ये ६४ तर गुजरातमध्ये ५ जणांचा मृत्यू

देशभरात मुसळधार; आसाममध्ये ६४ तर गुजरातमध्ये ५ जणांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
देशभरात मुसळधार; आसाममध्ये ६४ तर गुजरातमध्ये ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गुजरात, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.  अनेक ठिकाणी वाहतूक, शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.

गुजरातमध्ये सलग पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहेत. पूरग्रस्त भागांतून आतापर्यंत ४० हजार ५०० हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली.

आसाममध्ये २४ तासांत १४ जणांचा मृत्यू; एकूण ६४ जणांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर बनली आहे. गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला. पूरामुळे मृतांचा एकूण आकडा ६१ वर पोहोचला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांतील सुमारे ७.०५ लाख नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.  बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मध्य प्रदेशात मान्सूनची प्रभावी प्रणाली सक्रिय झाल्याने राज्यातील ३५ जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांत नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

उत्तर प्रदेशात संततधार 

उत्तर प्रदेशात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची जोरदार संततधार सुरू आहे. यामुळे ३० जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर राजस्थानमध्येही पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने राज्यातील विविध भागांसाठी ऑरेंज आणि ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

आजपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू 

दरम्यान, खराब हवामानामुळे सलग सहा दिवस स्थगित ठेवण्यात आलेली अमरनाथ यात्रा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. हवामानात सुधारणा झाल्यानंतर यात्रेकरूंना पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. प्रशासनाने आवश्यक सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवसही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा
सर्व पहा