संयम आणि परस्पर आदराचे आवाहन

नवी दिल्ली: देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
इन्स्टाग्रामवर केलेल्या आपल्या संदेशात गिलने करुणा, परस्पर आदर आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. कोणत्याही विशिष्ट आंदोलनाचा किंवा राजकीय घडामोडीचा उल्लेख टाळत त्याने भारताच्या तरुण पिढीला त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक संधी मिळाली पाहिजे, असे स्पष्ट केले.
"एक तरुण भारतीय म्हणून मला वाटते की, आपल्या पिढीला स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देण्याची संपूर्ण संधी मिळायला हवी," असे गिलने आपल्या संदेशात म्हटले आहे.
शिक्षण देशाच्या प्रगतीचे मजबूत आधारस्तंभ
शिक्षण देशाच्या प्रगतीचे सर्वात मजबूत आधारस्तंभ असल्याचे सांगत गिलने शांततामय आणि लोकशाही मार्गाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्यांप्रती पाठिंबा व्यक्त केला. मतभेद असले तरी परस्पर सन्मान आणि संवाद कायम ठेवणे आवश्यक असल्याचेही त्याने नमूद केले.
अलीकडच्या काळात विविध परीक्षा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढविण्याची मागणी होत आहे. अशा वातावरणात भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराने केलेले हे आवाहन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.