Home >> गोवा >> कथित अपहरणप्रकरणी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

कथित अपहरणप्रकरणी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

घटनेमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
1 hours ago
कथित अपहरणप्रकरणी दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

मडगाव : मडगाव येथील डॉ. सतीश कुडचडकर यांचे पुत्र संजील कुडचडकर यांच्या कथित अपहरणप्रकरणी मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा संबंध कौटुंबिक वादाशी असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला, तरी घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणात सशीर बिन मसूद (रा. मायना, कुडतरी; मूळ हैदराबाद) आणि शाह अली सौदागर (रा. दवर्ली; मूळ सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मडगावातील कोंब परिसरात भरदिवसा संजील कुडचडकर यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती. फुटेजमध्ये एक महिला आणि आणखी दोघेजण संजील यांना कारमध्ये घालून नेत असल्याचे दिसत असल्याची माहिती मडगाव पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांनी दिली.

संजील कुडचडकर यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर मडगाव पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार आणि त्यातील संशयितांचा कर्नाटकातील कारवार येथे शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. संजील कुडचडकर यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सर्व बाजूंनी तपास सुरू असून सध्या कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. 

पोलिसांच्या माहितीनुसार, संजील कुडचडकर आणि त्यांच्या पत्नीमध्ये दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद सुरू आहे. घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू होती. यापूर्वीही दोघांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर या कथित अपहरणामागे नेमके कोणते कारण होते, याचा उलगडा करण्यासाठी संजील यांच्या पत्नीची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, चौकशीनंतरच घटनेमागील खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा
सर्व पहा