दक्षिण गोव्यात अन्न व औषध प्रशासनाची धाड. रुमडामळ-सासष्टीत ७ आस्थापनांवर कारवाई; २० किलो पनीर जप्त आणि हजारो रुपयांचा दंड.

मडगाव : गोव्यातील जनतेला स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) दक्षिण गोव्यात दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीविरोधात धडक तपासणी मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत एफडीएच्या पथकाने सासष्टी तालुक्यातील रुमडामळ परिसरात अचानक धाडी टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या एका दूध पुरवठादाराला ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचे २० किलो विनालेबल आणि संशयास्पद पनीर जप्त करण्यात आले आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुमडामळ येथील सात अन्न आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. यात विनापरवाना चालणाऱ्या ५ युनिट्सवर आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात काम करणाऱ्या २ युनिट्सवर दंडात्मक कारवाई करत एकूण १४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बाजारात विक्रीसाठी आलेल्या दुधाचे आणि दुग्धजन्य पदार्थांचे विविध नमुने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दर्जा तपासणीसाठी गोळा केले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना एफडीएने कारणे दाखवा नोटीस बजावली असून, नियमांचे पालन न झाल्यास ही कारवाई अशीच तीव्र केली जाईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.