११ पवित्र मंदिरांचे घेता येणार दर्शन

पणजी : राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने २४ जुलै रोजी खांडोळा येथील श्री महागणपती मंदिरातून ‘एकादश तीर्थयात्रा’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील ११ पवित्र मंदिरांचा समावेश असलेल्या या विशेष तीन दिवसांच्या यात्रेद्वारे पर्यटक आणि भाविकांना राज्याच्या समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा अनुभव घेता येणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश भाविक आणि पर्यटकांना गोव्याच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेशी जोडणे हा असून, समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोव्याचे वेगळे रूप जगासमोर आणण्याचा पर्यटन खात्याचा प्रयत्न आहे.
उद्घाटन सोहळ्यात दोन विशेष तीर्थयात्रा बसना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. या बसमधून भाविकांना आणि पर्यटकांना सर्व मंदिरांना सुरक्षित, सोयीस्कर आणि नियोजनबद्ध पद्धतीने भेट देता येणार आहे. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसास्थळांवर आधारित पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या पर्यटन खात्याच्या प्रयत्नांना या उपक्रमामुळे बळ मिळणार आहे.
एकादश तीर्थयात्रेमुळे पर्यटकांना गोव्याच्या शेकडो वर्षांच्या मंदिर परंपरा, सांस्कृतिक वैभव आणि धार्मिक वारशाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, गोव्याची खरी ओळख केवळ समुद्रकिनाऱ्यांमध्ये नसून शतकानुशतके जपलेल्या परंपरा, ऐतिहासिक मंदिरे आणि समृद्ध सांस्कृतिक वारशात दडलेली आहे. ‘एकादश तीर्थयात्रा’ हा उपक्रम पर्यटकांना गोव्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल.
तीन दिवसांची तीर्थयात्रा
पहिला दिवस : श्री महागणपती देवस्थान (खांडोळा), श्री देवकीकृष्ण देवस्थान (माशेल), श्री अनंत देवस्थान (सावईवेरे), श्री महादेव मंदिर (तांबडी सुर्ला).
दुसरा दिवस : श्री ब्रह्मदेव देवस्थान (ब्रह्म करमळी, वाळपई), श्री संस्थान दत्तवाडी (साखळी) आणि श्री सप्तकोटेश्वर देवस्थान (नार्वे).
तिसरा दिवस : श्री परशुराम देवालय (पैंगीण), श्री शांतादुर्गा कुंकळ्येकरीण देवस्थान (फातर्पा), श्री दामोदर मंदिर (जांबावली) आणि श्री हरी मंदिर (मडगाव).