म्हाऊस, होंडा, शिर-सावर्डे, घोलवाडा-पर्ये येथेही दुर्घटना

म्हाऊस येथील जयदेव गावकर यांच्या घरावर पडलेले झाड बाजूला करताना अग्निशामक दलाचे जवान.
वाळपई : गुरुवारी पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सत्तरी तालुक्यात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला. म्हाऊस, सालेली, शिर-सावर्डे, घोलवाडा-पर्ये आणि बुद्रुक करमळी येथे झाडे व घराची भिंत कोसळल्याने चार घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. सुदैवाने सर्व घटनांमध्ये जीवितहानी टळली.
बोंडणवाडा-सालेली येथे रोहन गावस यांच्या घरावर सागवानाचे झाड कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. शिर-सावर्डे येथे लक्ष्मी पर्येकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून घराचे नुकसान झाले, तर घोलवाडा-पर्ये येथे झाड कोसळून दोन घरांचे नुकसान झाले. पर्ये येथील पेट्रोल पंपाजवळ आणि कुलमाया मंदिराजवळ रस्त्यावर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. बुद्रुक करमळी येथे घराची भिंत कोसळून शेजारच्या घराचेही नुकसान झाले.
वाळपई अग्निशामक दलाने सर्व घटनास्थळी तातडीने पोहोचून झाडे हटवणे, रस्ते मोकळे करणे आणि नुकसानग्रस्तांना मदत करण्याचे काम केले. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे लाखो रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले. प्रतिकूल हवामानात केलेल्या या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांनी जवानांचे कौतुक केले.
म्हाऊसमध्ये सर्वाधिक नुकसान
म्हाऊस येथील जयदेव कृष्णा गावकर यांच्या घरावर मोठे झाड कोसळून सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले. घराचे छप्पर व भिंतींचे नुकसान झाले असून घरातील साहित्याचीही नासधूस झाली. वाळपई अग्निशामक दलाने तातडीने मदतकार्य करून सुमारे पाच लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षित वाचवली.
धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करण्याची मागणी
सत्तरीत सातत्याने झाडे कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी अथवा हटविण्याची मोहीम राबवावी, तसेच नुकसानग्रस्त कुटुंबांना महसूल प्रशासनामार्फत तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
करमळी बुद्रुक येथे घराची भिंत कोसळून शेजारच्या घराचेही नुकसान
दोन कुटुंबांचे साडेचार लाखांचे नुकसान : टीव्ही, कपाट, कपडे, स्वयंपाकघरासह घरगुती साहित्यांची नासधूस
वाळपई : सत्तरी तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायत क्षेत्रातील करमळी बुद्रुक येथे गुरुवारी सायंकाळी एका घराची भिंत कोसळून शेजारच्या घरावर पडल्याने दोन कुटुंबांचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही घरांतील टीव्ही, कपाट, कपडे, स्वयंपाकघरातील साहित्य, फर्निचर तसेच दोन खोल्यांचे मोठे नुकसान झाले.सरकारी प्राथमिक शाळेजवळ सायं. सुमारे ६.५० वा. ही घटना घडली. मुसळधार पाऊस आणि सततच्या ओलाव्यामुळे केशव विठ्ठल हरवळकर यांच्या घराची भिंत कोसळून ती महादेव धानू पर्येकर यांच्या घरावर पडली. या दुर्घटनेत हरवळकर यांच्या घराचे सुमारे अडीच लाख, तर पर्येकर यांच्या घराचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशामक दलाचे वरिष्ठ अग्निशामक जवान संदीप एल. गावकर, ड्रायव्हर पंप ऑपरेटर अशोक नाईक आणि जवान उमेश गावकर यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवून परिसर सुरक्षित केला. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे सुमारे ५० हजार रुपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात यश आले. प्रतिकूल हवामानात केलेल्या मदतकार्याचे स्थानिकांनी कौतुक केले.
नुकसानभरपाईची मागणी
घटनेनंतर पंच उज्ज्वला गावकर यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांची भेट घेऊन शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडे विशेष आर्थिक सहाय्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अग्निशामक दलाने नुकसानीचा अहवाल तयार केला असून महसूल विभागाकडून पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.