Home >> गुन्हे >> ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांत २० लाखांचा गंडा

ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांत २० लाखांचा गंडा

ट्रेडिंग अॅप, व्हॉट्सअॅप कॉल, बनावट वाहतूक चलनाच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
20th July, 10:56 pm
ऑनलाईन फसवणुकीच्या तीन घटनांत २० लाखांचा गंडा

पणजी : गोव्यात सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन ट्रेडिंग, व्हॉट्सअॅप कॉलिंग आणि बनावट वाहतूक चलनाच्या माध्यमातून नागरिकांना लक्ष्य करण्याचे प्रकार वाढले असून, तिसवाडी, केपे आणि बाळ्ळी परिसरातील तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल १९ लाख ९७ हजार १६२ रुपये (सुमारे २० लाख) लंपास करण्यात आले आहेत. या तिन्ही प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभाग आणि संबंधित पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
ट्रेडिंग अॅपच्या आमिषाने १२.१४ लाखांची फसवणूक
तिसवाडी तालुक्यातील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 'एक्स ट्रेड' या बनावट ट्रेडिंग कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवत अज्ञातांनी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. त्यांना बनावट ट्रेडिंग अॅप डाउनलोड करण्यास सांगून भरघोस परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. तक्रारदाराने क्रेडिट कार्ड आणि यूपीआयद्वारे विविध खात्यांमध्ये १२,१४,५२७.९५ रुपये जमा केले. त्यानंतर अॅपवर १५,१५५ अमेरिकन डॉलर्सचा बनावट नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, पैसे परत मागितल्यानंतर आणखी शुल्काची मागणी करण्यात आल्याने फसवणूक उघड झाली. सायबर गुन्हे विभागाने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मोबाईल हॅक करून १.०२ लाखांची फसवणूक
फातर्पा-केपे येथील कल्पेश फळदेसाई यांना व्हॉट्सअॅप कॉल करून अज्ञाताने त्यांचा मोबाईल हॅक केला. त्यानंतर एसबीआय क्रेडिट कार्डमधून विविध ऑनलाइन व्यवहारांद्वारे १ लाख २ हजार ४८२ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. फसवणूक लक्षात येताच त्यांनी कुंकळ्ळी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
वाहतूक चलनाच्या बहाण्याने ६.८० लाखांची ऑनलाईन चोरी
बाळ्ळी-केपे येथील अल्केश नाईक यांना वाहतूक नियमभंगाचे १ हजार रुपयांचे चलन थकीत असल्याचा बनावट व्हॉट्सअॅप संदेश पाठवण्यात आला. चलन भरण्यासाठी एपीके फाइलची लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. लिंक उघडताच सायबर चोरट्यांनी मोबाईल आणि बँक खात्याचा ताबा मिळवत विविध व्यवहारांद्वारे ६ लाख ८० हजार १५२ रुपये काढून घेतले. या प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा