Home >> गुन्हे >> मोरजी येथे वकिलासह अशिलावर जीवघेणा हल्ला; १२ जणांविरुद्ध मांद्रे पोलिसांत गुन्हा

मोरजी येथे वकिलासह अशिलावर जीवघेणा हल्ला; १२ जणांविरुद्ध मांद्रे पोलिसांत गुन्हा

न्यायालयाने दिलेल्या हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या आदेशावरून मोरजीत मोठा वाद निर्माण झाला.

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
42 mins ago
मोरजी येथे वकिलासह अशिलावर जीवघेणा हल्ला; १२ जणांविरुद्ध मांद्रे पोलिसांत गुन्हा

पेडणे : न्यायालयाच्या निर्देशानुसार हॉटेलचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोरजी येथे गेलेले ॲडव्होकेट अंकुर कुमार आणि त्यांच्या अशिलावर ८ ते १० जणांच्या संतप्त गटाकडून लोखंडी सळ्या आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी मांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन नामनिर्देशित आरोपींसह इतर आठ ते दहा अज्ञात व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वकील अंकुर अनिल कुमार (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जुलै रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास मोरजी येथील टेमवाडा परिसरात ही घटना घडली.

तक्रारीनुसार, न्यायालयाने दिलेल्या बांधकाम पाडण्याच्या आदेशाच्या अंमलबजावणीवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून, घातक शस्त्रास्त्रांसह फिर्यादी आणि त्यांच्या अशिलाला रस्त्यात अडवले. संशयितांपैकी एकाने स्वतःची टाटा नेक्सॉन कार फिर्यादींच्या ग्रँड विटारा कारच्या मागे उभी करून त्यांना तेथून जाण्यास अटकाव केला.

यानंतर आरोपींनी संगनमताने फिर्यादींच्या वाहनावर दगडफेक केली आणि लोखंडी रॉडने गाडीची तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादी वकील आणि त्यांच्या अशिलाला गाडीतून बाहेर ओढून काढले आणि लाथाबुक्क्यांनी तसेच काँक्रीटच्या विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी वकील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या अशिलालाही मोठी दुखापत झाली आहे. संशयितांनी दोघांचे कपडे फाडले आणि पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, उपनिरीक्षक प्रतीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.  

हेही वाचा
सर्व पहा