बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडप

पणजी : बनावट कागदपत्राद्वारे बार्देश व इतर तालुक्यातील जमीन हडप प्रकरणी गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) संशयित सिद्दिकीउर्फ सुलेमान खान याच्यावर कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सिद्धीकीला अटक केली.
या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेटये यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, म्हापसा येथील एकतानगर हाऊसिंग बोर्ड मधील म्हापसा शहर चलता क्रमांक २ पीटी शीट क्रमांक ६७ मधील २० हजार ८१९ चौरस मीटर जमीन येथील उपनिबंधकांचा बनावट रबर स्टॅम्पचा वापर करून आणि कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासवून संशयित सिद्दिकी सुलेमान याने आपल्या नावावर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी सिद्धीकी याच्यासह इतर संशयितांविरोधात १९ सप्टेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल केला. याच दरम्यान वरील प्रकरण विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करण्यात आले. याच दरम्यान तो फरार झाला होता. त्यानंतर सिद्दिकीला पथकाने १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक केली होती. सिद्धीकीने १३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कोठडीतून पलायन केले होते. यानंतर त्याला २३ डिसेंबर २०२४ रोजी पुन्हा अटक केली. त्याच्या विरोधात आतापर्यंत चार गुन्हे दाखल केले आहेत.
याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २०२६ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई सुरू केली. ईडीने न्यायालयात अर्ज दाखल करून सिद्धीकीची कोठडी मागितली. न्यायालयाने त्याला अटक करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार, १६ जुलै २०२६ रोजी ईडीने सिद्धिकीला अटक केली आहे.