मायणा कुडतरी पोलिसांत अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंद

मडगाव : फेसबुकवर अर्धवेळ नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल ४ लाख ४७ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुवे येथील गोराटी येथील रहिवासी वियोला इव्हा फर्नांडिस यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. १४ एप्रिल रोजी दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास तक्रारदाराला फेसबुकवर अर्धवेळ नोकरीची एक जाहिरात दिसली. ती खरी असल्याचे समजून त्यांनी दिलेल्या लिंकवर संपर्क साधला.
सुरुवातीला संशयिताने तक्रारदाराला ऑनलाईन अॅपवर वेगवेगळ्या वस्तूंना रिव्ह्यू आणि रेटिंग देण्याचे डिजिटल काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी अज्ञात संशयिताने त्यांच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा केले. त्यानंतर, अधिक नफ्याचे आमिष दाखवून आणि वेगवेगळ्या कारणांचा बहाणा करून संशयिताने तक्रारदाराला मोठ्या रकमा भरण्यास भाग पाडले.
फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पुढील व्यवहार थांबवले. मात्र, तोपर्यंत संशयिताने तक्रारदाराकडून एकूण ४,४७,५०० रुपये उकळले होते. याप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक आशुतोष नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कोरगावात युवतीलाही
अज्ञाताने घातला होता गंडा
यापूर्वी व्हॉट्सअॅपवर घरबसल्या पार्टटाईम नोकरीचे आमिष दाखवून कोरगाव येथील २५ वर्षीय युवतीची ३ लाख ६९ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून मांद्रे पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारांत वाढ होत असून, घरबसल्या नोकरीच्या आशेने गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी, संशय आल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.