मडगावातील प्रकार : भामट्याकडून सराफाला गंडा

मडगाव : येथील श्री साई ज्वेलर्स या दुकानातून एका भामट्याने बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून ३ लाख ५६ हजार ५८६ रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी मडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यू मार्केट, मडगाव येथील श्री साई ज्वेलर्सचे मालक प्रीतम बांदोडकर यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयित आदित्य गायकवाड हा ग्राहक बनून दुकानात आला. त्याने साखळी खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी एनईएफटी केल्याचा खोटा दावा केला आणि आपल्या मोबाईलवर बनावट पेमेंट कन्फर्मेशनचा स्क्रीनशॉट तक्रारदाराला दाखवला. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे भासवून संशयिताने सोन्याची चेन ताब्यात घेतली आणि तो दुकानातून पसार झाला.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रीतम बांदोडकर यांनी पोलिसांत धाव घेतली. मडगाव पोलिसांनी याप्रकरणी संशयित आदित्य गायकवाड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष गावकर करत आहेत.