
म्हापसा : हणजूणचे जिल्हा पंचायत सदस्य तथा भाजपचे नेते नारायण लाडू मांद्रेकर (५५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झाले. ते सीमवाडा हणजूण येथील रहिवासी होत.
मंगळवारी सायंकाळी हणजूण पंचायतीजवळील श्री कुट्टेश्वर मंदिरातील नित्य आरतीचा कार्यक्रम संपल्यानंतर मांद्रेकर हे जवळीस गाळ्यावर चहासाठी बसले होते. चहा घेतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला व तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवोलीचे माजी आमदार दयानंद मांद्रेकर यांचे खंदे समर्थक म्हणून भाजपमध्ये नारायण मांद्रेकर यांची ओळख होती. गेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हणजूण मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीवर ते निवडून आले होते. स्व. मांद्रेकर हे हणजूणच्या माजी जिल्हा पंचायत सदस्या निहारिका मांद्रेकर यांचे पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन भाऊ, तीन बहिणी, भावजय, भावोजी असा परिवार आहे.