Home >> गोवा >> पावसाने घेतली विश्रांती; गोव्यात ताज्या माशांची बाजारात मोठी आवक

पावसाने घेतली विश्रांती; गोव्यात ताज्या माशांची बाजारात मोठी आवक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पावसाने घेतली विश्रांती; गोव्यात ताज्या माशांची बाजारात मोठी आवक

पणजी : गोव्यात सध्या खोल समुद्रातील मासेमारी बंद असली तरी पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात मासेमारी करता आली आहे. परिणामी, गेल्या महिनाभरानंतर गोमंतकीयांना पुन्हा एकदा ताज्या समुद्री माशांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने समुद्र शांत झाला आहे.  वातावरणही स्वच्छ आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात बांगडे, वेल्यो, बुराटे, करबट आदी मासे जाळ्यात अडकत आहेत. मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार, समुद्र शांत झाल्याने पाण्याचे तापमान वाढले आहे. त्यामुळे मासे पाण्याच्या वरच्या स्तरावर आणि किनाऱ्यालगत येऊ लागले आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्र खवळलेला असल्याने मासे खोल पाण्यात राहतात. त्यामुळे कितीही जाळी टाकली तरी अपेक्षित मासेमारी होत नाही. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर समुद्र शांत होताच मासे पुन्हा किनाऱ्याच्या दिशेने येतात आणि मच्छीमारांना त्याचा मोठा फायदा होतो, असे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

सध्या पारंपरिक मच्छीमार खोल समुद्रात न जाता किनाऱ्यापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर जाळी टाकत आहेत.  त्यांना विशेषतः बांगडे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत.  ताज्या बांगड्यांना बाजारात मोठी मागणी आहे.  बाजारात पोहोचताच लगेच विकले जात आहेत. बांगड्यांसह वेल्यो, बुराटे आणि कळवेही चांगल्या प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, गोव्यातील पारंपरिक मासळी  बाजारांमध्ये (Goa fish market) मोठे बांगडे शंभर रुपयांना सहा, तर लहान बांगडे शंभर रुपयांना दहा या दराने विकले जात आहेत. वेल्यो २५ ते ३० नगांसाठी सुमारे २०० रुपयांना उपलब्ध आहेत. बुराटे १०० रुपयांना एक वाटा या दराने विकले जात आहेत. कळवे तीन नग ५०० रुपयांना विकले जात आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा