Home >> गोवा >> बार्देशात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न

बार्देशात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न

पणजीत दोघांना अटक; आणखी घरफोड्यांच्या प्रयत्नांचा संशय

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बार्देशात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न

पणजी : बार्देश तालुक्यातील (Bardez Taluka) एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना उत्तर गोवा पोलिसांनी पणजीत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

प्राथमिक तपासात संबंधित संशयितांनी बार्देश परिसरातील आणखी काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विविध ठिकाणी संशयास्पद हालचाली केल्यानंतर त्यांनी घरफोडीचा डाव आखल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पणजी येथे दोन्ही संशयितांना पकडण्यात आले.

सध्या पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का, तसेच इतर घरफोड्यांशी त्यांचा संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस  (Goa Police) करत आहेत.