६२ वर्षांतील दुसऱ्या सर्वाधिक तापमानाची नोंद

पणजी : अनुकूल वातावरण नसल्याने गोव्यातील मान्सून कमजोर झाला आहे. पाऊस नसल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. २४ तासात पणजीत कमाल ३३.३ अंश तर किमान २७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे मागील ६२ वर्षांतील जुलै महिन्यातील दुसरे सर्वाधिक कमाल आणि किमान तापमान ठरले आहे.
पुढील सहा दिवसांत राज्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. राज्यात २४ तासात यंदाच्या जुलै महिन्यातील सर्वात कमी म्हणजेच केवळ १.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यातील १४ पैकी केवळ ४ केंद्रात अत्यल्प पाऊस पडला. १ जून ते १३ जुलै दरम्यान राज्यात सरासरी ३५.७३ इंच पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान राज्यात ५२.०५ इंच पावसाची नोंद होते. यंदा पावसाचे प्रमाण ३३ टक्क्यांनी कमी आहे.
राज्यात १३ ते १८ जुलै दरम्यान कमाल तापमान ३३ ते ३४ अंश तर किमान तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. २४ तासात मुरगाव मधील कमाल तापमान ३२ अंश व किमान तापमान २७.४ अंश सेल्सिअस राहिले. राज्यात १ जून ते १३ जुलै दरम्यान काणकोणमध्ये सर्वाधिक ४९.७८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
धारबांदोडा येथे ४३.५५ इंच, सांगेमध्ये ४०.६१ इंच, मडगावमध्ये ३९.५८ इंच, वाळपईमध्ये ३८.३६ इंच, फोंडामध्ये ३७.३४ इंच, केपेमध्ये ३६.९२ इंच, साखळीमध्ये ३५.३७ इंच, पेडणेमध्ये ३२.२५ इंच, म्हापसामध्ये २९.५९ इंच, मुरगावामध्ये ३०.३० इंच, दाबोळीमध्ये २९.७८ इंच तर पणजीमध्ये २५.७७ इंच पावसाची नोंद झाली आहे.