Home >> गोवा >> केळशीत प्रस्तावित तरंगत्या रिसॉर्टविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

केळशीत प्रस्तावित तरंगत्या रिसॉर्टविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

गरज पडल्यास बीडीओच्या एनओसीविरोधात उच्च न्यायालयात जाणार पंचायत!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
52 mins ago
केळशीत प्रस्तावित तरंगत्या रिसॉर्टविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

मुरगाव : गोव्यातील निसर्गरम्य गावांची ओळख आणि तेथील पर्यावरण राखण्यासाठी स्थानिक जनता आता अधिक सजग झाली असून, पर्यावरणपूरक नसलेल्या प्रकल्पांना लोकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. याचाच प्रत्यय मुरगाव तालुक्यातील केळशी गावात आला. येथे मेसर्स मोवाज एंटरप्रायझेसच्या प्रस्तावित मनोरंजन आणि तरंगत्या रिसॉर्ट प्रकल्पाविरोधात रविवारी एक विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. 

वास्को येथील  मुरगाव ब्लॉकच्या गटविकास अधिकाऱ्याकडून या प्रकल्पासाठी मिळालेल्या तात्पुरत्या नाहरकत प्रमाणपत्रावर (एनओसी) चर्चा करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. केळशीतील सर्वेक्षण क्रमांक १७०/० मधील या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक रहिवासी, पंच सदस्य आणि चर्चच्या धर्मगुरूंनी एका सुरात तीव्र विरोध दर्शवला. या वादग्रस्त प्रकल्पाविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निर्धार करत पंचायतीने बीडीओच्या या निर्णयाविरोधात थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

या विशेष ग्रामसभेला स्थानिक आमदार आंतोन वास यांनी उपस्थित राहून लोकांच्या भावनेला पाठिंबा दिला. प्रकल्पाच्या कायदेशीर आणि राजकीय बाजू मांडताना आमदार आंतोन वास यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, परिस्थिती काहीही असो, हा प्रकल्प गावात कोणत्याही परिस्थितीत राबवू दिला जाणार नाही. तसेच काही हितसंबंधी लोक या प्रकरणी पंचायतीची आणि ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या वादग्रस्त प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक संस्कृती आणि नदीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला थारा दिला जाणार नाही, यावर सर्वांचे एकमत झाले. पंचायत आणि आमदारांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता हा लढा केवळ गावापुरता मर्यादित न राहता न्यायालयीन पातळीवर पोहोचला आहे. 

हेही वाचा
सर्व पहा