खा. सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती : आमदार शेट्येंसह इतरांनी दिल्या शुभेच्छा

पायी वारीमध्ये सहभागी खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, विवेक नाईक, कुमुदिनी नाईक व इतर.
गोवन वार्ता प्रतिनिधी
डिचोली : मुखी विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय - गोवाच्या पायीवारीने शनिवारी सकाळी ९.१५ वा. मेणकुरे येथील श्री देवी माऊलीचा आशीर्वाद घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान केले. निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक विवेक के. नाईक, मेणकुरेच्या सरपंच कुमुदिनी नाईक, श्री देवी माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष सदानंद नाईक, पत्रकार दिलीप देसाई, पंच गुरुदास परब व भाविक मोठ्या संख्येने श्री देवी माऊली मंदिर क्षेत्रात उपस्थित होते.
विठ्ठलाची आस आणि ध्यास लागल्यामुळे वारकऱ्यांची पावले पंढरपूरला चालली आहेत. त्यांचे जीवन सुखमय होवो हीच सदिच्छा. त्यांचा प्रवास सुखकर होवो, असे सांगून खासदार सदानंद शेट तानावडे यांनी शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला देवानंद नाईक यांनी सर्वांचे स्वागत केले. श्री माऊली देवीला व माऊलीच्या पादुकांना पंचारती ओवाळून व पादुकांचे पूजन झाल्यानंतर महाआरती झाली. चंद्रकांत वसकर यांनी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी गाऱ्हाणे घातले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका रथामध्ये स्थानापन्न केल्यानंतर पायीवारीला सुरुवात झाली.
देवानंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत अभिजीत तेली व सुरेंद्र गाड उपादिंडी प्रमुख आहेत. बाबनी शेटकर (शिवोली) व किशोर नाईक (कुमयामळा-साळ) हे चोपदार, तर डॉ. संजय तांबे व डॉ. पाटील हे आरोग्याच्या सेवेला तत्पर आहेत. इथर्नेट एक्सप्रेसचे मालक सागर गोवेकर यांनी वारीतील वारकऱ्यांना मोफत रेनकोटचे वितरण केले. या दिंडीत ४८ महिलांंसह एकूण २५० जण सहभागी झाले आहेत.
युवकांच्या सहभागामुळे संस्कृतीचे जतन : डॉ. शेट्ये
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये म्हणाले की, विठ्ठल दर्शनाची आस लागल्याने आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. वारीत युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने संस्कृतीचे जतन तर होणारच, तसेच भावी पिढीत धर्माची बीजे रुजवली जातील. भागवत धर्माची पताका निरंतर चालू राहील यात शंकाच नाही.