Home >> गोवा >> साप्ताहिकी : खून, प्राणघातक हल्ले, अपघातांनी राज्य हादरले; हॉस्टेल मेस प्रकरणी प्रशासनाचा बडगा

साप्ताहिकी : खून, प्राणघातक हल्ले, अपघातांनी राज्य हादरले; हॉस्टेल मेस प्रकरणी प्रशासनाचा बडगा

मागील आठवड्यात गोव्यात गुन्हेगारी, अपघात, न्यायालयीन घडामोडींचा घेतलेला आढावा

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
8 hours ago
साप्ताहिकी : खून, प्राणघातक हल्ले, अपघातांनी राज्य हादरले; हॉस्टेल मेस प्रकरणी प्रशासनाचा बडगा

पणजी : गेल्या आठवड्यात गोव्यात गुन्हेगारी, अपघात आणि न्यायालयीन घडामोडींचा घटनाक्रम चर्चेत राहिला. कौटुंबिक वादातून चाकू हल्ला, परिचारिकेवरील जीवघेणा हल्ला, विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, रेंट अ कार अपघात, झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू, फरार सराफाला अटक, जन्मठेपेची शिक्षा, ड्रग्ज प्रकरणातील जामीन, बोगस प्रमाणपत्र प्रकरण, गोवा विद्यापीठातील मेस वाद आदी घटनांनी राज्यभरात खळबळ उडवली. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.

रविवार
कासावली येथे कौटुंबिक वादातून पती-पत्नीवर चाकूने हल्ला

कासावली येथील मडालेम भागात शनिवारी कौटुंबिक वादाचे हिंसक रूप धारण झाल्याने एका व्यक्तीने पती-पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पतीच्या मानेवर गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीही जखमी झाली.


अटक प्रक्रियेतील त्रुटींमुळे ड्रग्जप्रकरणी संशयिताला जामीन
ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेल्या संशयिताच्या अटक प्रक्रियेतील त्रुटींमुळे मेरशी येथील विशेष (एनडीपीएस) न्यायालयाने संशयित सलिहीन सलीम बोंड्या याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. त्याच्याकडून ६.३६ लाख रुपये किमतीचे व्यावसायिक प्रमाणातील ६३.६५ ग्रॅम मेथाम्फेटामाइन जप्त केले होते.

सोमवार
संदीप सुवर्णाच्या व्हिसेरा अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा‍

कळंगुट येथे उडुपीतील जलक्रीडा व्यावसायिक संदीप सुवर्णा (४२, रा. मालपे कर्नाटक) याच्या मृत्यूचे कारण शवचिकित्सा अहवालातून स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता पोलिसांनी व्हिसेरा फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवला असून, या अहवालातून संदीपचा मृत्यू हा झोपेच्या गोळ्यांमुळेच की अजून कोणत्या गुंगीच्या औषधामुळे झाला आहे, हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

फरार सराफ भीमाप्पा चलवादीला होस्पेट-कर्नाटक येथे अटक

गहाण ठेवलेले दागिने परत करण्यास टाळाटाळ करून अनेक महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला सराफ भीमाप्पा चलवादी याला मुरगाव पोलिसांनी कर्नाटकातील होस्पेट येथून अटक केली. त्याला वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मंगळवार
तुये आरोग्य केंद्राबाहेर परिचारिकेवर धारदार शस्त्राने हल्ला

तुये येथील सरकारी आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या परिचारिका विघ्नाली कुबल (२४, रा. वझरी-पेडणे) यांच्यावर मंगळवारी सायंकाळी संशयित गौतम उदय देविदास या युवकाने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विघ्नाली गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोगस प्रमाणपत्रांचा धक्का; दोन अधिकारी अडचणीत
बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी दक्षता संचालनालयाने केलेल्या प्राथमिक चौकशीत दोन अधिकारी दोषी आढळल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. पुढील कारवाईसंदर्भातील फाईल सध्या सरकारकडे प्रलंबित आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये फेरफार असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

बुधवार
राय येथे सहकाऱ्याचा खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

दमन, राय येथे २०२० मध्ये सहकारी एडिसन सोरंग (२१ वर्षे) याच्यावर फावड्याने हल्ला करत खून करणार्‍या दोघांना मडगावातील दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रदीप डुंगडुंग व आनंद साशा (दोघेही मूळ रा. झारखंड) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.

बाणावलीत बेकायदेशीर धिरयो आयोजन, दोघांवर गुन्हा
बाणावली समुद्रकिनार्‍यानजीक आयोजित एका बेकायदेशीर बैलांच्या झुंजीत पराभूत बैल जीव वाचवण्यासाठी खवळलेल्या समुद्रात शिरला व त्याचा जीव गेला. या घटनेनंतर कोलवा पोलिसांनी संशयित आंतानिओ फर्नांडिस व सलीम यांच्याविरोधात गुन्हा नोंद केलेला आहे.

दाबोळी येथे स्कूटरवर कोसळले झाड; वृद्ध चालकाचा मृत्यू

माटवे–दाबोळी–वास्को या वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी सकाळी चालत्या स्कूटरवर एक मोठे झाड अचानक कोसळून चालक जागीच मृत्यू पावला. रस्त्या बाजूचे झाड फ्रांसिस्को नुनेस (६०,जेटी-सडा ) यांच्यासाठी काळ बनून आले व त्यांचा दुर्दैवी अंत झाला. झाड कोसळल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तातडीने दाखल झाल्या. झाड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

गुरुवार
गोवा वेल्हा येथे रेंट अ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

रेंट अ कार चालकांच्या बेदरकारपणामुळे अपघात सुरूच आहेत. गोवा वेल्हा-बांबोळी मार्गावर रेंट अ कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला.

बर्च क्लबविरुद्धचा मनी लाँड्रिंग खटला सुरू; संशयितांना नोटीस
हडफडे येथील बर्च नाईट क्लबची मूळ कंपनी आणि तिच्या मालकांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) दाखल केलेल्या खटल्याची पहिली सुनावणी म्हापसा येथील विशेष न्यायालयात गुरुवारी ९ रोजी झाली. न्यायालयाने सौरभ लुथरा, गौरव लुथरा, अजय गुप्ता, सुरिंदर कुमार खोसला आणि मेसर्स बीइंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा हडफडे एलएलपी, यांना नोटीस बजावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे.

शुक्रवार
गोवा विद्यापीठाचा हॉस्टेल मेस कंत्राटदार निलंबित

गोवा विद्यापीठाच्या हॉस्टेल मेसच्या जेवणात अळ्या सापडल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे पुन्हा त्याच्याकडे कंत्राट जाऊ नये यासाठी त्याला काळया यादीत टाकले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुंदर धुरी यांनी स्पष्ट केले.

अस्नोडा येथे विजेच्या धक्क्याने घेतला कर्मचाऱ्याचा बळी
बार्देश तालुक्यातील अस्नोडा येथे काम करत असताना विजेचा धक्का लागून वीज कर्मचारी मंथन आरोस्कर (वय ३०, रा. म्हावळ‌िंगे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘ड्युटी’ बजावत असताना त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. त्यात या युवकाचा अकाली बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवार
म्हापशात स्टेशनरी दुकान फोडले;
७० हजारांची रक्कम लंपास

म्हापसा येथील बँक ऑफ इंडियाजवळील कृष्णा स्टेशनरी दुकान अज्ञात चोराने फोडले. दरम्यान या दुकानातील ७० हजारांची रोख रक्कम चोरांनी लंपास केली असून पोलिसांकडून चोराचा शोध सुरू करण्यात आला आहे.
........................
तिस्क-उसगाव येथे दुचाकीचा अपघात; एक जखमी
तिस्क-उसगाव येथे झारखंड नोंदणीकृत मोटरसायकलचा अपघात होऊन एक जण जखमी झाला. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित चालकाने मद्यधुंद अवस्थेत मोटरसायकल चालविल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
........................
लक्षवेधी

म्हापसा : ओझरान-वागातोर परिसरातील नाईटक्लबमधून रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे त्रस्त झालेल्या एका रहिवाशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ईमेलद्वारे भावनिक साकडे घालत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
मडगाव : बाणावली समुद्रकिनाऱ्यानजीक आयोजित करण्यात आलेल्या एका बेकायदेशीर बैलांच्या झुंजीत (धिरयो) दुर्घटना घडली. या झुंजीत पराभूत झालेला एक बैल जीव वाचवण्यासाठी पळत सुटला आणि थेट खवळलेल्या समुद्रात शिरला, जिथे पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पणजी : गृहनिर्माण सोसायट्यांमार्फत कन्व्हेयन्स डीड करून फ्लॅटधारकांच्या नावावर मालकी हस्तांतरित करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझा फ्लॅट’ योजनेमुळे सरकारला किमान ५० ते ६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. ही माहिती सहकार व महसूल खात्यातील सूत्रांनी दिली.
पणजी : अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे संशयाचा फायदा देत मेरशी येथील उत्तर गोवा सत्र न्यायालयाने ज्ञानेश्वर सूर्यकांत कांदोळकर याची निर्दोष मुक्तता केली.
पेडणे : तुये येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्स विघ्नाली विजय कुबल यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौतम देविदास (वय २५) याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पणजी : पणजीतील कला अकादमीचे दिनानाथ मंगेशकर सभागृह १ ऑगस्टपासून दुरुस्तीसाठी बंद राहणार आहे. हे काम कधी पूर्ण होणार हे तज्ज्ञ सदस्यांनी सादर केलेल्या अंतिम अहवालावर अवलंबून आहे. यासाठी आयआयटी चेन्नईचे डॉ. पिल्लई यांची तज्ञ म्हणून नेमणूक केली आहे.
मडगाव : सासष्टी तालुक्यातील नुवे परिसरात एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित स्टॅनली कुतिन्हो याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.