Home >> गोवा >> आठ दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात ३ ते १२ टक्क्यांनी वाढ

आठ दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात ३ ते १२ टक्क्यांनी वाढ

गावणे धरणातील साठा ७२.९ टक्के : पावसाचे प्रमाण २९.६ टक्क्यांनी कमी


6 hours ago
आठ दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात ३ ते १२ टक्क्यांनी वाढ

आमठाणे धरणाचे संग्रहित छायाचित्र.

प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी : जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाने जोर धरला होता. मागील आठवडाभर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. असे असले तरी विविध धरणांतील पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे. आठ दिवसांत विविध धरणांतील पाणीसाठ्यात ३.४ ते १२.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ११ जुलै अखेरीस गावणे धरण सर्वाधिक ७२.९ टक्के भरले आहे. आमठाणे धरणातील पाणीसाठा ६६.६ टक्के झाला आहे. चापोली धरण ५५.१ टक्के भरले आहे. पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस पडल्यास धरणातील पाणी पातळी आणखी वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात ३५.६ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ११ जुलै अखेरीस यामध्ये वाढ होऊन तो ४७.७ टक्के झाला. पंचवाडी धरणातील पाणी साठा आठ दिवसांत ९.५ टक्क्यांनी वाढून ४०.२ टक्के झाला. ३ जुलै रोजी अंजुणे धरणात १४.१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ११ जुलै अखेरीस त्यात वाढ होऊन तो २३.९ टक्के झाला. आठ दिवसांत गावणे धरणातील पाणीसाठा १०.७ टक्के वाढून ७२.९ टक्के झाला आहे.
यंदा काणकोण तालुक्यात पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे चापोली धरणातील पाणीसाठा आठ दिवसांत ३.४ टक्क्यांनी वाढून तो ५५.१ टक्के झाला आहे. ३ जुलै रोजी आमठाणे धरणात ६०.७ टक्के पाणीसाठा होता. ११ जुलै अखेरीस ६६.६ टक्के झाला आहे. वरील कालावधीत तिळारी धरणातील पाणीसाठा २१.७ टक्क्यांनी वाढून ५३.२ टक्के झाला आहे. सध्या तिळारी वगळता अन्य सर्व धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. तिळारीमधून १६.८४ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
पुढील सहा दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस
शनिवारी राज्यात तुरळक पावसाची नोंद झाली. बहुतेक ठिकाणी ऊन पडले होते. राज्यात १ जून ते ११ जुलै दरम्यान सरासरी ३५.६८ इंच पावसाची नोंद झाली. यंदा पावसाचे प्रमाण २९.६ टक्क्यांनी कमी आहे. पुढील सहा दिवस राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शनिवारी पणजीत कमाल ३२.४ अंश, तर किमान २७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३२.८ अंश, तर किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस राहिले.
   

हेही वाचा
सर्व पहा