वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय : लाईनमनच्या मृत्यूच्या दुर्घटनांनंतर वीज खाते सतर्क

पणजी : वीज वाहिन्यांवर काम करताना होणारे अपघात टाळण्यासाठी आणि लाईनमनांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वीज खात्याने दर महिन्याला सुरक्षा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणात सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर, विजेचा धक्का बसू नये यासाठी घ्यावयाची काळजी तसेच सुरक्षित पद्धतीने काम करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती वीज खात्याचे कार्यकारी अभियंता वल्लभ सामंत यांनी दिली.वीज वाहिन्यांवर काम करताना विजेचा धक्का लागून लाईनमनांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी अस्नोडा येथेही विजेचा धक्का लागून एका लाईनमनचा मृत्यू झाला. यापूर्वी गेल्या वर्षी डिचोली परिसरात इन्व्हर्टरच्या रिव्हर्स करंटमुळे एका लाईनमनचा मृत्यू झाला होता. या घटनांमुळे लाईनमनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामंत यांनी सांगितले की, अस्नोडा येथील घटनेत संबंधित लाईनमनला ग्राऊंड पॅट्रोलिंगचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे मुख्य वीज प्रवाह खंडित करण्यात आला नव्हता. ग्राउंड पेट्रोलिंग दरम्यान केवळ जमिनीलगत असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे अपेक्षेचे असते, तरीही कर्मचाऱ्याने उंचावरील फांद्या कापण्यास सुरुवात केल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
दरम्यान, अस्नोडा येथील दुर्घटनेची खातेमार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच मृत लाईनमनच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
काम करताना ‘या’ नियमांचे पालन बंधनकारक
* लाईनवर काम सुरू करण्यापूर्वी ती पूर्णपणे बंद करणे आणि टेस्टर लावून विद्युत प्रवाह नाही ना, याची खात्री करणे अनिवार्य आहे.
* ट्रान्सफॉर्मरवर काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने अर्थिंग रॉड लावणे आवश्यक आहे.
* कामाच्या वेळी हेल्मेट घालणे, रबरी हातमोजे वापरणे आणि चांगल्या दर्जाचे निर्दोष टेस्टर वापरणे याविषयीचे प्रशिक्षण आता सातत्याने दिले जाणार आहे.
दुर्गम भागात किंवा जंगलात वीज लाईनचे पेट्रोलिंग करताना अथवा फॉल्ट शोधताना प्रत्येक वेळी अभियंत्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य होत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते.
- वल्लभ सामंत, वीज अभियंता