
डिचोली : डिचोली तालुक्यातील मावळींगे येथे एका घरात विजेचे काम करताना विजेचा धक्का बसून आयटीआय विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी डिचोली पोलिसांनी दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात वीज खात्यातील लाईनमन केदार मांद्रेकर आणि घरमालक समीर मावळींगेकर या दोघांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी मयत अक्षांत राजेश नाईक (वय २०, रा. देऊळवाडा, लामगाव, बिचोली) यांचे वडील राजेश प्रभाकर नाईक यांनी डिचोली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यावरून वरील गुन्हा नोंदवण्यात आला.
तक्रारीनुसार, गेल्या महिन्याच्या २६ जून रोजी मावळींगे येथील नव्याने बांधण्यात आलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील विद्युतीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी वीज खात्यात वायरमन/लाईनमन म्हणून कार्यरत असलेल्या केदार कृष्णा मांद्रेकर यांनी विद्युत क्षेत्रात आयटीआयचे शिक्षण घेत असलेल्या अक्षांत नाईकला प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने मदतीसाठी कामावर घेतले.
कामादरम्यान पहिल्या मजल्यावरील नव्याने बसविण्यात आलेल्या वायरिंगची चाचणी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खालच्या मजल्यावरील वीजपुरवठा जोडण्यात आला. यावेळी अक्षांतला जोरदार विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने डिचोलीतील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार विजेचा धक्का लागल्यामुळे मेंदू व फुफ्फुसांमध्ये सूज येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणातील चौकशीत संबंधित वायरमनने आवश्यक पात्रता नसताना विद्यार्थ्याला धोकादायक विद्युत कामात सहभागी करून घेतल्याचे समोर आले. घरमालक समीर रामनाथ मावळींगेकर यांनी पुरेशा सुरक्षेची खात्री न करता हे काम करण्यास परवानगी दिल्याचे पुढे आले. विद्युत कामासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्यात निष्काळजीपणा झाल्याचा आरोप आहे.
या निष्काळजीपणामुळे अक्षांत नाईकचा मृत्यू झाल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी (Bicholim Police) दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०६(१) सह कलम ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही संशयितांना बीएनएसएसच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विराज धौसकर करीत आहेत.