गुरांना धडकून दुचाकीस्वार जखमी होण्याच्या प्रकारांत वाढ

फोंडा : कुर्टी-खांडेपार आणि उसगाव पंचायत क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील पथदीप पेटत नसल्याने रस्त्यावर बसणाऱ्या गुरांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर दुचाकीची रस्त्यावरील गुरांना धडक बसून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पथदीपाची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनचालक करीत आहेत.
कुर्टी ते खांडेपार पर्यंतच्या रस्त्याचे पथदीप गेल्या काही दिवसांपासून पेटत नाहीत. त्यात रस्त्यावर मोठ्या संख्येने गुरे ठाण मांडून बसलेली दिसून येतात. काळोखात वाहन चालकांना गुरांचा अंदाज येत नसल्यामुळे अवजड वाहनाची धडक बसून गुरे दगावण्याचे प्रकार घडत आहेत. एमआरएफ कंपनी समोरील रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांत ६-७ गुरे अज्ञात वाहनाच्या धडकेने दगावली आहेत. तर, उसगाव पुलाजवळ गेल्या २ महिन्यांत अंदाजे १० पेक्षा अधिक गुरे अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडली. दोन्ही पंचायत क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून भटक्या गुरांचा संचार वाढल्याने अपघातात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
उसगाव परिसरात गेल्या एका महिन्यापासून रात्रीच्या वेळी दुचाकीची धडक गुरांना बसून गुरे जखमी होण्याचे प्रकार वाढले आहेत. उसगाव पुलाजवळ तर एकाच रात्री दोन दुचाकींची धडक गुरांना बसण्याची घटना घडली होती. सुदैवाने दुचाकी चालक किरकोळ जखमी झाले. प्रतापनगर- धारबांदोडा येथे तर दिवसा अचानक रस्त्यावर आलेल्या गुरांना धडक बसल्याने एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे रात्री पथदीपाची अत्यंत गरज आहे.
कुर्टी- खांडेपार पंचायतचे सरपंच नावेद तेहसीलदार यांनी सांगितले की, कुर्टी पंचायत क्षेत्रात भटक्या गुरांचा संचार वाढलेला आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पेटत नसलेल्या पथदीपाची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला पत्र पाठविण्यात आले असल्याचे सांगितले.
पथदीप पेटत नसल्याने आणि भटक्या गुंराचा संचार वाढल्याने रात्रीच्यावेळी अपघात घडत आहेत. यासंबंधी बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्गाला पत्र पाठवून पथदीपाची दुरुस्ती करण्याची मागणी पंचायततर्फे करण्यात आली आहे, असे उसगाव पंचायतीचे सरपंच राजेंद्र नाईक यांनी सांगितले.