Home >> गोवा >> गोवा विद्यापीठाचा मेस कंत्राटदार निलंबित : रजिस्ट्रार सुंदर धुरी

गोवा विद्यापीठाचा मेस कंत्राटदार निलंबित : रजिस्ट्रार सुंदर धुरी

चौकशी समिती नेमणार; विद्यार्थ्यांना जेवणात अळ्या सापडल्यानंतर कारवाई

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
54 mins ago
गोवा विद्यापीठाचा मेस कंत्राटदार निलंबित : रजिस्ट्रार सुंदर धुरी

पणजी : गोवा विद्यापीठाच्या हॉस्टेल मेसच्या जेवणात अळ्या सापडल्याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराला निलंबित करण्यात आले आहे. यापुढे पुन्हा त्याच्याकडे कंत्राट जाऊ नये यासाठी त्याला काळया यादीत टाकले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुंदर धुरी यांनी स्पष्ट केले. 

शुक्रवारी याविषयी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे (भाजयुमो) रजिस्ट्रारांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यानंतर हे निर्णय घेण्यात आले. 

रजिट्रार धुरी यांनी सांगितले की, काल मेसच्या जेवणात अळ्या आणि किडे सापडले होते. मी देखील जेवणातील अळ्या पाहिल्या होत्या. हा प्रकार खरोखरच दुर्दैवी होता. यानंतर आम्ही कालच कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून दंड ठोठावला होता.  आज सकाळी याच दिवशी बैठक घेण्यात आली. आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा नाही. त्यामुळे आम्ही कंत्राटदाराला कायमस्वरूपी निलंबित करून त्याला काळया यादीत टाकले आहे. विद्यापीठातील अन्य दोन कॅन्टीनचे काम स्थानिक स्वयंसहाय्यता गटांना देणार आहोत. ही दोन कॅन्टीन सोमवारपासून सुरू होतील. 

ते म्हणाले, कंत्राटदाराला काढल्याने काही दिवस मेस बंद राहणार आहे. मात्र यामुळे पैसे भरलेल्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुढील आठवड्यापर्यंत ही मेस चालवायला नवीन कंत्राटदार घेतला जाणार आहे. या प्रकरणी कॅन्टीन समितीच्या सदस्य सचिवाला देखील कारणे दाखवा नोटीस जारी केली जाईल. भविष्यात हॉस्टेल वॉर्डन, कॅन्टीन समितीच्या सदस्यांनी मेस, कॅन्टीनला रोज भेट देण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. तसेच मी स्वतः देखील या कॅन्टीन मध्ये जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भाजयुमोचे अध्यक्ष तुषार केळकर यांनी सांगितले की, मागील तीन वर्षे या हॉस्टेल मेसच्या जेवणाबाबत तक्रारी येत आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अन्न आणि औषध प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी या मेसवर छापा टाकला होता. त्यावेळी कंत्राटदाराने अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र विद्यापीठाने त्याच्यावर कारवाई केली नाही. या प्रकरणी कॅम्पस समितीच्या सदस्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आमच्यासाठी राजकारणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

अभाविप व इतर विद्यार्थी संघटनांकडून निषेध, निवेदन 

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल विविध विद्यार्थी संघटनांनी घेतली असून, रजिस्ट्रार धुरी यांना निवेदन देऊन निषेध केला आहे. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व इतर संघटनाचा समावेश आहे. 

हेही वाचा
सर्व पहा