Home >> गोवा >> रवी नाईक, भाटीकर यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली

रवी नाईक, भाटीकर यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली

भाजपच्या उमेदवारीसाठी रितेश, दळवींमध्ये चुरस : राजेश वेरेकरांमुळे काँग्रेसचेही पारडे जड

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th July, 11:13 pm
रवी नाईक, भाटीकर यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणे बदलली

फोंडा मतदारसंघात २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवी नाईक यांच्या रूपाने भाजपाने हा मतदारसंघ प्रथमच जिंकला. पण कृषी मंत्री असलेल्या रवी नाईक यांचे निधन झाल्यामुळे सध्या मतदारसंघात भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे. इच्छुक उमेदवारांच्या संख्येत वाढ झाल्याने पक्षात विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी होण्याची शक्यता वाढली आहे. त्यात केतन भाटीकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात ओढण्यात भाजप, काँग्रेस व मगो पक्ष प्रयत्नशील आहे.

कृषी मंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत भाजपने रितेश नाईक यांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेस पक्षातर्फे केतन भाटीकर रिंगणात उतरले होते. मात्र, पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच न्यायालयाने निवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे सध्या फोंडा मतदारसंघ विनाआमदार वाटचाल करत आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकिटासाठी रितेश नाईक आणि विश्वनाथ दळवी यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.

केतन भाटीकर यांचे कार्यकर्ते, काँग्रेसची तयारी

केतन भाटीकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या गटात ओढण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि मगो पक्ष प्रयत्नशील आहेत. भाटीकर यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू कोणती भूमिका घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कौतुक भाटीकर यांनी केतन भाटीकर यांचे समाजसेवेचे व्रत पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दुसरीकडे, काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा ठाम निश्चय केला असून त्यांनी फोंडा नगरपालिका आणि कुर्टी पंचायतीमधील लोकांच्या गाठीभेटी घेत जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष मतदारसंघात पुन्हा बाजी मारण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

मडकई मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केलेले मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा मतदारसंघात नवीन कार्यालय सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे फोंड्यातून मगो पक्षातर्फे मिथिल ढवळीकर की सुदिन ढवळीकर निवडणूक लढवणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय फोंड्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक हेसुद्धा ऐनवेळी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आम आदमी पक्षाचे गीतेश नाईक हेदेखील लोकांच्या समस्या मांडून मतदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय गोवा फॉरवर्ड व अन्य पक्षातर्फेही उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

भाजप-मगोप युतीबाबत मतदारांमध्ये संभ्रम

गेल्या काही वर्षांपासून गोव्यात भाजप आणि मगो पक्षाचे युती सरकार कार्यरत आहे. मात्र, फोंडा मतदारसंघात भाजप आणि मगो पक्षाचे कार्यकर्ते आजवर कधीही एकत्रितपणे काम करताना दिसलेले नाहीत. फोंडा पालिका आणि कुर्टी पंचायतीमध्ये दोन्ही पक्षांचा संघर्ष सतत सुरू असतो. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप आणि मगो पक्षाची युती पुन्हा होणार का, असा प्रश्न मतदार विचारत आहेत.

भाजप उमेदवारीसाठी रस्सीखेच अन् दळवींची माघार

• २०२२ मध्ये रवी नाईक यांनी फोंड्यातून भाजपला विजय मिळवून दिला होता. त्यांच्या निधनानंतर भाजप मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक विश्वनाथ दळवी यांनी विधानसभेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

• पोटनिवडणुकीवेळी रवी यांचे सुपुत्र रितेश नाईक यांचे नाव आघाडीवर होते, मात्र दळवी यांनीही उमेदवारीसाठी उत्सुकता दाखवल्याने रस्सीखेच सुरू होती. त्यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दळवी यांची समजूत काढून रितेश यांचा मार्ग मोकळा केला होता.

• आता आगामी निवडणुकीत भाजप पक्षश्रेष्ठी नगरसेवक रितेश नाईक की नगरसेवक विश्वनाथ दळवी यांना उमेदवारी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२०२२ मधील निवडणुकीची आकडेवारी

फोंडा मतदारसंघात २०२२ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रवी नाईक यांना ७,५१४ मते, मगो पक्षाचे केतन भाटीकर यांना ७,४३७ मते, काँग्रेसचे राजेश वेरेकर यांना ६,८३९ मते, आरजीचे सानिश तिळवे यांना १,७७० मते, अपक्ष उमेदवार संदीप सिनाई खांडेपारकर यांना १,२३७ मते, आम आदमी पक्षाचे अॅड. सुरेल तिळवे यांना ६२० मते, तर अपक्ष उमेदवार नरेश पडवळ यांना ९२ मते प्राप्त झाली होती.

फोंडा विधानसभा मतदारसंघ २०२२ - उमेदवार व मते

• भाजप : रवी नाईक : ७,५१४ मते
• मगो : केतन भाटीकर : ७,४३७ मते
• काँग्रेस : राजेश वेरेकर : ६,८३९ मते
• आरजी : सानिश तिळवे : १,७७० मते
• अपक्ष : संदीप सिनाई खांडेपारकर : १,२३७ मते
• आम आदमी पक्ष : अॅड. सुरेल तिळवे : ६२० मते
• अपक्ष : नरेश पडवळ : ९२ मते

हेही वाचा
सर्व पहा