आयजीपीसह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या

पणजी : निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) आयएएस (IAS) संजय गोयल यांची अरुणाचल प्रदेशात बदली झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह पोलीस महानिरीक्षक (IGP) आणि इतर आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनीही बैठका घेऊन ईव्हीएम (EVM) मशीनची तपासणी तसेच इतर कामे सुरू केली आहेत. गेल्या आठवड्यात वरिष्ठ नागरी सेवा अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारने जारी केले होते. आता केंद्र सरकारने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामुळे मुदत संपण्यापूर्वीच राज्यात विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी पदावर असलेले संजय गोयल यांची अरुणाचल प्रदेशात बदली झाली आहे. याशिवाय पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) अभयकृष्ण शर्मा आणि पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) वर्षा शर्मा यांची दिल्लीत बदली झाली आहे. तर पोलीस अधीक्षक अर्शी आदिल आणि टिकमसिंग वर्मा यांची जम्मू-काश्मीरमध्ये बदली करण्यात आली आहे. तर आयपीएस गौरव शिकरवार आणि श्वेता सिंह चौहान यांची गोव्यात बदली झाली आहे.