बेळगाव दौऱ्यावर आले असता दिले निर्देश

पणजी : बेळगावच्या पहिल्या अधिकृत दौऱ्यावर गुरुवारी आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी गोवा आणि महाराष्ट्रातून होणारी अवैध दारू तसेच अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच बेळगाव दौऱ्यावर आलेल्या शिवकुमार यांनी सीमावर्ती भागातील कायदा व सुव्यवस्था आणि तस्करीच्या प्रश्नाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित विभागांना सीमांवर गस्त वाढविणे, तपासणी अधिक प्रभावी करणे आणि संशयास्पद वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.
गोवा आणि महाराष्ट्रातून अवैध दारू तसेच अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीमावर्ती भागातील बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.