बंगळुरू : ‘क्विक कॉमर्स ॲप्स’च्या विरोधात एक मोठी कारवाई करत, कर्नाटक अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने ॲमेझॉन, इन्स्टामार्ट आणि बिगबास्केट यांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. मानवी सेवनासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विषारी धोतरा फळे आणि बिया विकल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
प्राधिकरणाने यापूर्वी धोतरा उत्पादनांच्या विक्रीची, तसेच या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या ऑनलाईन सूचीकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. विषारी उत्पादने विकणाऱ्या मोठ्या क्विक कॉमर्स कंपन्यांविरुद्ध आलेल्या तक्रारींच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे.
विभागाला आपल्या तपासणीत असे आढळून आले की, धोतराची फळे आणि बिया विषारी आहेत. त्यांचे सेवन केल्यास मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. असे असूनही, काही प्रकरणांमध्ये एफएइएसएआय (FSSAI) परवाना किंवा नोंदणी क्रमांकांसह विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ती विक्रीसाठी प्रदर्शित केली जात होती.
पाकिटांवर अन्न परवाना/नोंदणी क्रमांक
धोतराची फळे आणि बिया असलेल्या पाकिटांवर अन्न परवाना/नोंदणी क्रमांक आढळून आले. ही उत्पादने गोदामांमध्ये साठवून ऑनलाईन माध्यमांद्वारे विक्री किंवा वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. कर्नाटकने धोतरा विक्रीवरून अमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट, बिगबास्केटचे (Amazon, Instamart, BigBasket) परवाने निलंबित केले. ॲमेझॉनने प्रतिसाद दिला नाही, तर इन्स्टामार्टने आपण केलेल्या कारवाईसंदर्भात कागदपत्रे सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला. बिगबास्केटने फळांची ऑनलाईन विक्री थांबवली असल्याचे स्पष्ट केले.


