ओडिशा: अंधश्रद्धेचा कहर!; पत्नी परत यावी, यासाठी दिला मित्राचा नरबळी
घरी जेवायला बोलावून झोपेतच मुंडके छाटले; पाच जणांना अटक: अंधश्रद्धेचा कहर म्हणावी अशी घटना ओडिशातील बलांगिर जिल्ह्यात घडली. पत्नी सोडून गेल्याने ती पुन्हा आपल्याकडे परत यावी, यासाठी एका व्यक्तीने आपल्या मित्राचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयिताने मित्राला घरी जेवण्यासाठी बोलावले आणि तो गाढ झोपेत असताना त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित शत्रूघ्न साहूसहीत पाच जणांना अटक केली आहे.
Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
34 mins ago

भुवनेश्वर : अंधश्रद्धेचा कहर म्हणावी अशी घटना ओडिशातील बलांगिर जिल्ह्यात घडली. पत्नी सोडून गेल्याने ती पुन्हा आपल्याकडे परत यावी, यासाठी एका व्यक्तीने आपल्या मित्राचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संशयिताने मित्राला घरी जेवण्यासाठी बोलावले आणि तो गाढ झोपेत असताना त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित शत्रूघ्न साहूसहीत पाच जणांना अटक केली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोडून गेलेली पत्नी पुन्हा परत यावी यासाठी संशयिताने अंधश्रद्धेतून हा भयंकर प्रकार केला. मित्राला विश्वासात घेऊन घरी बोलावल्यानंतर त्याला जेवण दिले. त्यानंतर तो झोपल्यानंतर संशयिताने त्याची निर्घृण हत्या केली. बलांगिर जिल्ह्यातील बाग्डा गावात ही घटना घडली.
कापलेले मुंडके पुरले देवघरात; धड फेकले तलावात
सविस्तर माहितीनुसार साहू याने तेबाडमुंडा येथील संतोष खारसेल (४० वर्षे) या मतिमंद मित्राला १८ ऑगस्ट रोजी घरी जेवायला बोलावले. त्यानंतर रात्री संतोष गाढ झोपेत असताना संशयिताने धारदार शस्त्राने त्याचे मुंडके धडावेगळे केले. हत्या केल्यानंतर अघोरी पूजेचा भाग म्हणून त्याने संतोषचे कापलेले मुंडके स्वत:च्या घरातील पूजाघरात फरशीखाली खड्डा खोदून गाडले तर धड जवळ असलेल्या तलावात फेकून दिले.
कापलेले धड तलावात तरंगताना पाहून परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ माजली. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासाची चक्रे जलद फिरवत संशयित शत्रूघ्न साहू याच्या घरावर छापा टाकून पाहणी केली. पूजाघराच्या जमिनीखाली पुरलेले संतोषचे मुंडके बाहेर काढून पुढील तपास सुरू केला.
१० वर्षांपूर्वी पत्नी सोडून गेली होती
बलांगिरचे पोलीस अधीक्षक अभिलाष यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित खूनप्रकरणाची घटना नसून, अंधश्रद्धेतून दिलेला नरबळी आहे. संशयिताची पत्नी १० वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली होती. नरबळी दिल्यास ती परत येणार असा गैरसमज व अंधश्रद्धा त्याच्या डोक्यात थैमान घालत होती. त्यातूनच ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूण या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संशयिताला अटक करून कोठडीत पाठवले आहे.