पणजी : गोव्यातील सांगे येथील प्रसिद्ध संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाच्या गणेशोत्सवासाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दरवर्षी भव्य आणि आकर्षक बक्षिसांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाने यंदा आपल्या परंपरेचा विस्तार करत थेट तीन अलिशान २-बीएचके फ्लॅट्स पहिल्या तीन क्रमांकांची बक्षिसे म्हणून जाहीर केले आहेत. याशिवाय टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, विविध कंपन्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या, चारचाकी आणि दुचाकी वाहनांचाही बक्षिसांमध्ये समावेश करण्यात आला आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपासून या बहुप्रतिक्षित लॉटरीच्या तिकीट विक्रीला अधिकृत सुरुवात होत आहे.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या लॉटरीतील पहिले बक्षीस मडगाव येथील रेल्वे स्थानक व पॉवर हाऊस बायपास रस्त्यावरील केएफसी आणि 'मिस्टर डीआयवाय' जवळ असलेल्या 'केजी पॅलेडियम' इमारतीतील २-बीएचके फ्लॅट तसेच रोख रक्कम ४३,८०,००० आहे. दुसरे बक्षीस फोंडा येथील उत्तरकर नगरी, शांतीनगर भागातील २-बीएचके फ्लॅट व सोबत ३३,००,००० रुपये रोख. तर तिसरे बक्षीस सांगे शहरातील 'साऊथ मिडोज्' नव्या प्रकल्पातील २-बीएचके फ्लॅट तसेच १९,००,००० रोख असे ठेवण्यात आले आहे. विजेत्यांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी मंडळाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे विजेत्याला भरावा लागणारा ३३ टक्के उत्पन्न कर (इनकम टॅक्स) किंवा भेट कर (गिफ्ट टॅक्स) हा संपूर्णपणे मंडळाच्या वतीने भरला जाणार आहे. यामुळे विजेत्याला कोणत्याही अतिरिक्त कराचा बोजा न सोसता थेट फ्लॅटचा ताबा मिळेल.
फ्लॅट्सव्यतिरिक्त इतर प्रमुख बक्षिसांमध्ये टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, महिंद्राची इलेक्ट्रिक एक्सयूव्ही, टाटा कर्व्ह ईव्ही, ई-व्हिटारा, किआ सेल्टॉस, विन्सर, तीन टाटा टियागो आणि तीन मारुती ब्रेझा अशा अलिशान गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय पाच दुचाकी गाड्या आणि रोख रक्कमही बक्षीस म्हणून दिल्या जाणार आहेत. यंदा एकूण २१ भाग्यवान विजेत्यांना ही बक्षिसे मिळणार आहेत. गेल्या वर्षी फातोर्डा येथील पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याला आणि कुडचडे येथील एका नागरिकाला फ्लॅटचे बक्षीस लागले होते, ही आठवण सांगताना मंडळाने यंदाही गरजू लोकांपर्यंत ही बक्षिसे पोहोचावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मागील वर्षी म्युनिसिपालिटी मार्केट इमारतीजवळ झालेली प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, यंदा तिकीट विक्रीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. सांगे बस स्थानक आणि पोलीस ठाण्याच्या समोरील सांगे म्युनिसिपालिटी गेस्ट हाऊस (ट्रायबल रिसर्च सेंटर इमारत) येथे तिकीट विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. यंदा एकूण २ लाख तिकिटे छापण्यात आली असून एका तिकिटाची किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. एका बुकामध्ये १० तिकिटे असून त्याची किंमत ५,००० रुपये आहे. तिकीट खरेदीसाठी केवळ रोख रक्कम स्वीकारली जाणार असून कोणतीही ऑनलाईन पद्धत उपलब्ध असणार नाही. तिकीटांची विक्री उद्यापासून होत आहे.

लॉटरी तिकिटांचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी मंडळाने कडक नियम लागू केले आहेत. सुरुवातीला एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोन बुक्स (२० तिकिटे) खरेदी करण्याची मुभा दिली जाईल. गर्दी आणि मागणीनुसार ही मर्यादा प्रतिव्यक्ती एक बुक किंवा अर्ध्या बुकावर आणली जाईल. या लॉटरीतून जमा होणारा निधी केवळ गणेशोत्सवाच्या धार्मिक कार्यक्रमांसाठीच नव्हे, तर सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो. गेल्या वर्षी जमा झालेल्या निधीतून विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी सुमारे ३० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असणार असून अनंत चतुर्दशीला श्रींचे विसर्जन होणार आहे. यंदाच्या उत्सवात भगवान श्री नरसिंह अवताराचा भव्य देखावा हे मुख्य आकर्षण असणार आहे.



