कोलवाळ कारागृहातील छापेमारीत सहा मोबाईल सापडले

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारागृहाची झडती घेतली. या छापेमारीतून सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.


21st August, 11:37 pm
कोलवाळ कारागृहातील छापेमारीत सहा मोबाईल सापडले

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात ड्रग्ज तस्करीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारागृहाची झडती घेतली. या छापेमारीतून सहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वा. कारागृहात सेवा बजावणाऱ्या गोवा मनुष्यबळ विकास विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक संशयित आशा रेवानंद चोडणकर हिला ड्रग्ज तस्करी प्रकरणी सुरक्षारक्षकांनी रंगेहात पकडले होते. संशयित महिलेकडून गरम पाण्याच्या थर्मासमध्ये २ ग्रॅम चरस आणि २३६ ग्रॅम गांजा, असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा ड्रग्ज, तसेच तिच्या लॉकरमध्ये तीन मोबाईल फोन आणि तीन एटीएम कार्डही सापडले होते.
शुक्रवार, २१ रोजी या ड्रग्ज तस्करीच्या पार्श्वभूमीवर कारागृह महानिरीक्षक केशव राम चौरासिया यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहाच्या अधीक्षक सुचिता देसाई, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर व अधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली कारागृह प्रशासनाने पोलिसांच्या साहाय्याने कारागृहावर संयुक्त छापा टाकला. या छापेमारीमध्ये कारागृहातील कन्विक्ट, अंडर ट्रायल, हायसेक्युरिटी व महिला अशा चार कैदी विभागांमध्ये एकूण सहा मोबाईल फोन व दोन मोबाईलचे तुटलेले भाग सापडले. हे मोबाईल आणि त्या वस्तू कारागृह प्रशासनाने जप्त केल्या. रात्री उशिरा कारागृहाच्या अधीक्षक सुचिता देसाई यांनी कोलवाळ पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली व जप्त केलेले मोबाईल फोन पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
आशा चोडणकरचा कोठडीतील मुक्काम वाढला
दरम्यान, ड्रग्ज तस्करी प्रकरणातील गोवा मनुष्यबळ विकास विकास महामंडळाच्या सुरक्षारक्षक संशयित आरोपी आशा चोडणकर हिला म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने आणखी तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.             

हेही वाचा
सर्व पहा