गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे २ आणि ३ सप्टेंबर रोजी निवडणुकीची तयारी आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गोव्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची गोवा भेट महत्त्वाची ठरणार आहे.
फातोर्डा-मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये त्यांच्या बैठका तसेच अन्य कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती गोवा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. कला अकादमी उपलब्ध नसल्याने मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये त्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यांच्यासोबत महासंचालक (प्रसारमाध्यम) तसेच महासंचालक (आयटी) हे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. २ सप्टेंबर रोजी ते बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणूक होणाऱ्या राज्यांना भेट देऊन मुख्य निवडणूक आयुक्त निवडणूक तयारी आणि परिस्थितीचा आढावा घेत आहेत. त्यामुळे त्यांची गोवा भेट महत्त्वाची ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
महाविद्यालयांमध्ये मतदार साक्षरता क्लब स्थापन करण्यात आले आहेत. या क्लबच्या विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयांत शिकणारे अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच मतदार झाले आहेत, तर काही जण मतदार होण्याच्या मार्गावर आहेत. मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा, तसेच मतदान करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.


