गोव्याच्या रक्षणासाठी मजबूत संघटना उभी करणार : वीरेश बोरकर

आरजीपी पक्षातील बंडाळीची चर्चा वीरेश बोरकर यांनी फेटाळली असून २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात पक्षाची संघटनात्मक पुनर्रचना यावर विरेश यांनी भाष्य केले. तळागाळातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली असून नवीन ब्लॉक कमिट्या लवकरच जाहीर होणार आहेत असेही ते म्हणाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
8 hours ago
गोव्याच्या रक्षणासाठी मजबूत संघटना उभी करणार : वीरेश बोरकर

पणजी : गोव्यातील आगामी तीन दिवशीय पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी आज सकाळी कामकाज सल्लागार समितीची (BAC) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे (RGP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी पक्षातील अंतर्गत वादाच्या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. पक्षात कोणतेही अंतर्गत राजकारण किंवा बंडाळी शिल्लक नसून पक्ष पूर्णपणे एकसंध आणि मजबूत असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.

पक्षात एकसंधता आणि संघटनात्मक पुनर्रचनेवर भर

सध्या पक्षाचे सर्व लक्ष राज्यभरातील संघटनात्मक पुनर्रचना आणि विविध मतदारसंघांमधील ब्लॉक कमिट्यांच्या पुनर्गठनावर केंद्रित आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच नवीन कमिट्या अधिकृतपणे जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर पक्षाचे काम अधिक आक्रमक व प्रभावीपणे मैदानावर दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी भाजप सरकारच्या धोरणांविरोधात सक्षम पर्याय उभा करणे हेच पक्षाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य मित्रपक्षांसोबत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' आणि जागावाटपाच्या मुद्द्यावर सकारात्मक विचार सुरू असला, तरी पक्ष स्वबळावर सर्व मतदारसंघांत तयारी करत असून, पक्षाची मध्यवर्ती समिती योग्य वेळी अधिकृत राजकीय भूमिका जाहीर करेल, असे बोरकर म्हणाले.

 शिवोलीत आढावा बैठक आणि कार्यकर्त्यांशी संवाद

संघटनात्मक पुनर्रचनेच्या या मोहिमेचा भाग म्हणून काल शिवोली मतदारसंघात आरजीपीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेची जबाबदारी, शिस्त आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याबाबत सविस्तर मंथन करण्यात आले.

बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोरकर यांनी सांगितले की, राजकीय बदल हे केवळ घोषणा देऊन होत नसतात, तर त्यासाठी तळागाळातील जनता आणि पक्षसंघटना यांच्यात भक्कम व निरंतर संवाद असणे आवश्यक असते. पक्षाची ही पुनर्रचना केवळ सत्ता किंवा व्यवस्था बदलण्यासाठी नसून गोव्याचे सौंदर्य, संस्कृती आणि गोमंतकीयांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.

हेही वाचा
सर्व पहा