कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : संशयित सोहम नाईकची जामिनावर सुटका

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
5 hours ago
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण : संशयित सोहम नाईकची जामिनावर सुटका

पणजी : कुडचडे येथील बहुचर्चित लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याची जामिनावर सुटका झाली आहे. न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याच्यावर अत्यंत कडक अटी व शर्ती लादल्या आहेत.

संशयित सोहम नाईकविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेने न्यायालयात आरोपपत्र सादर केले असून एका प्रकरणात अटक न करताच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालय आणि बाल न्यायालयासमोर चाललेल्या सुनावणीदरम्यान, चारही प्रकरणांमध्ये न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान दोन महत्त्वाच्या प्रकरणांतील पीडितांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व कायदेशीर पुरावे, तपासाची दिशा आणि संशयिताचा पाच महिन्यांचा कारावास या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने हा जामीन आदेश दिला आहे.

दक्षिण गोव्यात बंदी

सोहम नाईकची सुटका करताना न्यायालयाने आरोपीला खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत दक्षिण गोवा जिल्ह्यात प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई केली आहे. त्यामुळे सध्या त्याला उत्तर गोवा जिल्ह्यातच वास्तव्य करणे अनिवार्य राहील. पीडित पक्ष, साक्षीदार आणि तपास यंत्रणा यांच्यावर कोणताही थेट वा अप्रत्यक्ष दबाव येऊ नये, तसेच निष्पक्ष वातावरणात सुनावणी पार पडावी, यासाठी न्यायालयाने हे निर्बंध लादले आहे.

'सोशल मीडिया ट्रायल'वर आक्षेप

या प्रकरणात संशयिताचे वकील ॲड. अमेय प्रभुदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोशल मीडियावरील अनिर्बंध चर्चांवर तीव्र चिंता व्यक्त केली. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सोशल मीडियावर होणारे 'व्हर्च्युअल ट्रिब्युनल' आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेला बाधा पोहोचवू शकतात असे ते म्हणाले. कोणत्याही पुराव्याशिवाय व्यक्तींवर चिखलफेक करणे हे लोकशाही परंपरेला घातक असून समाजाने समांतराऐवजी अधिकृत न्यायालयीन चौकटीवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा या कायदेशीर घडामोडींमधून समोर येत आहे.


हेही वाचा
सर्व पहा