मडगाव : एकतर्फी प्रेमातून वेर्णा येथे राहणार्या सख्ख्या मामा- मामीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणातील संशयित आकाश कुमार गुड्डू चौधरी (२३) याला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने अटींसह जामीन मंजूर केला. पोलिसांनी जामिनाला विरोध केला होता. परंतु, तक्रारदार मामीने कौटुंबिक शांततेसाठी तडजोडीची तयारी दर्शवत प्रतिज्ञापत्र सादर केल्याने न्यायालयाने आरोपीला सशर्त जामीन दिला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मूळचा बिहारमधील वैशाली येथील रहिवासी आकाश कुमार ४ जुलै २०२६ रोजी सकाळी कासावली येथील भाड्याच्या खोलीत राहणारा त्याचा मामा जितेंद्र कुमार जयस्वाल आणि मामी प्रियांका यांच्याकडे गेला होता. आकाशचे मामीवर एकतर्फी प्रेम होते. तो तिच्याबाबत कमालीचा संवेदनशील असल्याचे तपासात समोर आले.
खोलीत आल्यानंतर आकाशने हातात चाकू घेत मामीला धमकावत, माझे ऐकले नाही तर नस कापून आत्महत्या करेन, असे सांगितले. मामा जितेंद्र यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता संतप्त आकाशने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. पतीला वाचवण्यासाठी धावलेल्या मामी प्रियांका यांच्या मनगटावरही चाकू लागून त्या जखमी झाल्या. झटापटीत मामीला धक्का देऊन संशयित घटनास्थळावरून पसार झाला. जितेंद्र यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आकाशला अटक केली होती.
संशयित गोव्याचा रहिवासी नसल्याने जामीन मिळाल्यानंतर तो फरार होण्याची शक्यता आहे, तसेच मामीच्या प्रेमात असलेला संशयित पुन्हा हल्ला करू शकतो किंवा त्यांच्या अल्पवयीन मुलांना धोका निर्माण करू शकतो, असा युक्तिवाद पोलिसांनी जामिनाला विरोध करताना केला.
दरम्यान, तक्रारदार प्रियांका यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हा प्रकार गैरसमजातून घडल्याचे सांगितले. आकाश आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना त्याला रोखण्याचा प्रयत्न करत असताना त्यातून ही घटना घडली, असे त्यांनी नमूद केले. तसेच कुटुंबात समेट झाला असून जुने कौटुंबिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तक्रार पुढे नेण्याची इच्छा नसल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. संशयिताचे वय, सुरू असलेले शिक्षण आणि मूळ तक्रारदाराची तडजोडीची भूमिका लक्षात घेऊन न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभू देसाई यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. न्यायालयाने २५ हजारांचा वैयक्तिक बाँड, तेवढ्याच रकमेचा स्थानिक हमीदार सादर करणे, तसेच कासावली गावात प्रवेशबंदी केली असून तक्रारदार किंवा तिच्या कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास प्रतिबंध केला आहे. तपास अधिकार्यांनी बोलावल्यास वेर्णा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहणे आणि पुराव्यांमध्ये कोणताही हस्तक्षेप न करणे, या अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.
मामा-मामीचे चोरून व्हिडिओ रेकॉर्ड
तपासादरम्यान संशयिताने मामा-मामीच्या खोलीच्या मागील खिडकीतून त्यांचे चोरून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही समोर आले. पोलिसांनी हे व्हिडिओ जप्त केले आहेत. तसेच बिहारमध्येही आकाशने यापूर्वी मामीवर हल्ला केल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.


