गोव्यात उभारणार विश्व कोकणी भवन!

मुख्यमंत्र्यांची घोषणा : गोवा कोकणी अकादमीच्या साहित्य, भाषा सेवा पुरस्कारांचे वितरण

Story: गोवन वार्ता।प्रतिनिधी |
31 mins ago
गोव्यात उभारणार विश्व कोकणी भवन!

पणजी : गोव्यात कोकणी विश्व भवन उभारण्याचा विचार सुरू आहे. मंगळुरू येथील भवनाच्या धर्तीवर सरकारी खर्चातून हे भवन उभारण्यात येईल. मात्र, या भवनातील मूलभूत काम साहित्यिकांनी करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कोकणी राष्ट्रमान्यता दिनानिमित्त गोवा विद्यापीठाच्या सभागृहात गोवा कोकणी अकादमीतर्फे कोकणी साहित्य आणि भाषा सेवा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. मंचावर गुजरात साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. भाग्येश झा, राजभाषा सचिव प्रसाद लोलयेकर, सरस्वती व कुवेम्पु पुरस्कार विजेते महाबळेश्वर सैल, राजभाषा संचालनालयाचे प्रभारी संचालक विवेक नाईक आणि गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष पूर्णानंद च्यारी उपस्थित होते.

यावेळी नामवंत साहित्यिक पुंडलिक नायक यांना वर्ष २०२५ साठी साहित्य प्रतिभा पुरस्कार, तर डॉ. जयंती नायक यांना साहित्य प्रज्ञा पुरस्कार, वर्ष २०२६ साठी देविदास कदम यांना साहित्य प्रतिभा पुरस्कार, तर भालचंद्र गावकर यांना साहित्य प्रज्ञा पुरस्कार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते देण्यात आला.


वर्ष २०२५ साठी ‘भांगरभूंय’चे संपादक महेश दिवेकर यांना कोकणी प्रसारमाध्यमातील कौशल्य पुरस्कार देण्यात आला. तसेच ‘प्रुडंट मीडिया’चे लौकिक शिलकर यांना कोकणी प्रसारमाध्यमातील कौशल्य पुरस्कार २०२६, तर ‘गोवा स्टोरीज’चे माहीम भांडारी यांना यंदाचा कोकणी सेवा डिजिटल पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी इतर विजेत्यांनाही पुरस्कार देण्यात आले.

कोकणी भाषेमुळेच गोवा हे राज्य म्हणून अस्तित्वात आले. त्यामुळे गोव्यात कोकणी विश्व भवन उभारण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मी भवनाची घोषणा केली आहे; मात्र हा विषय कुठेतरी मागे राहिला. मंगळुरू येथे जाऊन कोकणी विश्व भवन पाहिले असून, तेथे करण्यात आलेल्या कामाची मी प्रशंसा करतो. एखादी खासगी संस्था हे काम करू शकते, तर सरकार का करू शकत नाही, असा प्रश्न मला पडतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या कामाची सुरुवात लोकांनी करावी. सरकार केवळ पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मदत करू शकते. मात्र, भवनातील मूलभूत काम साहित्यिकांनी करणे आवश्यक आहे. एखादे भवन बांधून देण्याचे काम माझ्या हातात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्रादेशिक भाषेत भारत सरकारच्या पातळीवर तियात्राला प्रथमच मान्यता मिळाली आहे. युनेस्कोची मान्यता मिळावी यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंग्रजी शिकल्याशिवाय गोव्यातील तरुण पुढे जाऊ शकणार नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, कोकणी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा आत्मसात केल्यास गोव्यातील तरुण आणखी प्रगती करू शकतो, असे माझे ठाम मत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अनेक तरुणांनी हे मोठ्या प्रमाणात सिद्ध करून दाखवले आहे. विदेशी भाषा शिकाव्यात; मात्र त्यासोबत आपली अस्मिता असलेली कोकणी भाषाही शिकल्यास तरुणांना भविष्यात मोठी प्रगती करता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकारी अधिसूचना कोकणीत आणण्याचा प्रयत्न

सरकारी अधिसूचना कोकणी भाषेतून प्रसिद्ध व्हाव्यात, यासाठी राजभाषा संचालनालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आतापर्यंत १५ कायद्यांचे कोकणीत भाषांतर करण्यात आले असून, भविष्यात ही प्रक्रिया प्रत्यक्षात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

हेही वाचा
सर्व पहा