खर्गेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत पोल‍ीस महासंचालकांना भेटणार : काँग्रेस

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
6 hours ago
खर्गेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत पोल‍ीस महासंचालकांना भेटणार : काँग्रेस

पणजी: काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या ताफ्यावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. याबाबत आम्ही तक्रार देऊनही अद्याप एफआयआर दाखल झालेली नाही. याविषयी आम्ही पोलीस महासंचालकांना भेटून याबाबत कारवाई करण्यासाठी  निवेदन देणार असल्याचे काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष विठू मोरजकर यांनी सांगितले. 

शुक्रवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जितेंद्र गावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मोरजकर म्हणाले की, भाजप आपण शिस्तबद्ध, सर्वात मोठा पक्ष असल्याचे सांगतो. मात्र त्यांच्या युवा विभागाच्या पदाधिकाऱ्यांची वागणूक पूर्ण राज्याने नव्हे तर देशाने पाहिली आहे.

यामुळे देशभरात गोव्याचे नाव खराब झाले आहे. खर्गे हे विरोधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेतच शिवाय ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. असे असूनही त्यांच्या ताफ्यावर हल्ला होतो हे पोलिसांचे अपयश आहे. या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. 

जितेंद्र गावकर म्हणाले, खर्गे हे एससी समाजाचे मोठे नेते आहेत. काही दिवसांपूर्वी ते उत्तराखंड येथे एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाचे शुद्धीकरण केले. भाजप आजही वर्णव्यवस्था मानतो हा याचा पुरावा आहे. संविधानाने आम्हाला सर्व अधिकार दिले आहेत. कायद्यानुसार जातीनुसार भेदभाव करणे हा गुन्हा आहे. एवढी मोठी घटना होऊन देखील भाजपच्या एससी विभागाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  या घटनेचाही आम्ही निषेध करतो.

नियोजित हल्ला ?

गावकर म्हणाले की, भारतीय जनता युवा मोर्चाचे तुषार केळकर यांनी पोलिसांनी आपल्याला निदर्शने करण्यास जागा ठरवून दिल्याचे सांगितले आहे. झेड सुरक्षा असणाऱ्या व्यक्तीच्या ताफ्याजवळ निदर्शने करण्यास पोलीस, गृह खात्याने परवानगी कशी दिली, हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले पाहिजे.

हेही वाचा
सर्व पहा