प्रलंबित प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करणार

पणजीतील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी भाजपच्या मंत्र्यांची बैठक झाली. विविध खात्यांतील प्रलंबित प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करण्याबरोबरच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांना दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.


21st August, 11:21 pm
प्रलंबित प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करणार

गोवन वार्ता। प्रतिनिधी
पणजी : विविध खात्यांतील प्रलंबित प्रकल्प ३ ते ४ महिन्यांत पूर्ण करण्याबरोबरच कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्र्यांना दिले. विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.
पणजीतील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी भाजपच्या मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, तसेच सर्व मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. दुपारपासून सुरू झालेली बैठक रात्रीपर्यंत चालली. सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पंचायतमंत्री माॅविन गुदिन्हो, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर यांच्यासह अन्य मंत्री बैठकीला उपस्थित होते.


मंत्र्यांनी पूर्ण केलेली तसेच प्रलंबित कामे आणि खात्यांच्या योजनांचा आढावा घेतला. खात्यांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी वेगाने करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यासही सांगण्यात आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सरकारला साडेचार वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्र्यांनी आपापल्या खात्यांच्या कामगिरीचे सादरीकरण केले, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले.
अमित शहा आमदार, मंत्र्यांना करणार मार्गदर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ६ सप्टेंबरला गोव्यात येणार आहेत. त्यावेळी ते आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठकीनंतर दिली. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. विविध खात्यांमध्ये तसेच मंत्र्यांच्या कामात समन्वय असणे आवश्यक आहे. समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.
कर्मचारी भरती आयोगावर चर्चा नाही
बैठक शांततेत पार पडली. कर्मचारी भरती आयोगाचा विषय बैठकीत आला नाही, असे दामू नाईक यांनी सांगितले. कर्मचारी भरती आयोगामार्फत होणाऱ्या भरतीवरून यापूर्वी बैठकीत वाद झाला होता. मात्र, यावेळी असा कोणताही प्रकार घडला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीलेश काब्राल आणि मी चांगले मित्र : सुभाष फळदेसाई
आमदार नीलेश काब्राल बैठकीला उपस्थित होते. ते आणि मी चांगले मित्र आहोत. आमच्यात चांगले संबंध आहेत, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा
सर्व पहा